माझी पहिली कथा ( ऑडीओसह )

पुनश्च    दि. बा. मोकाशी    2019-04-03 12:26:59   

(अंक – ललित – मार्च, १९७५)  

कथा, कादंबरी, प्रवासवर्णन असे विविध प्रकार दि.बा. उर्फ दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांनी हाताळले.  जेमतेम शिक्षण झाल्यावर टाकलेले रेडिओ दुरुस्तीचे दुकान आणि त्यानंतरचा प्रथितयश लेखक म्हणून झालेला प्रवास अशी मोकाशींची दोन अंगे आहेत. 'देव चालले', 'आनंद ओवरी' या त्यांच्या कादंबऱ्या आजही त्यांच्या शैलीतील वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहेत. साधी, प्रसन्न निवेदन शैली आणि प्रवाही संवाद ही त्यांची खासियत होती. १९४०च्या सुमारास त्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. गोष्ट लिहिण्याचा त्यांचा ध्यास आणि त्यासाठीचा पहिला प्रयत्न याची गंमतीदार हकीकत त्यांनी ललितच्या अंकात १९७५ साली लिहिली होती. ती वाचतानाही त्यांच्या नेहमीच्या शैलीचा अनुभव येतो. पुनश्च चा आजचा हा लेख आपण ऐकूही शकता. ऐकूही शब्दावर क्लिक करा.

********

आगगाडीचा खड्खड् आवाज संथ येत होता. रात्र होती. बाहेर चांदणे होते. मी खिडकीतून चांदण्यात डुबलेले जग बघत होतो. माझ्या मनात येत होतं कविता करणं किंवा कथा लिहिणं किती सोपं आहे. ‘पडले होते रम्य चांदणे’ अशी काव्याला सुरवात करता येईल किंवा ‘चांदण्यातून गाडी धावत होती’ अशी कथेची सुरवात करता येईल. या दोहोंपैकी म्हणाल ते रचता येईल. पण ‘म्हणाल ते रचता येईल’ म्हणत असता पहिल्या ओळीच्या किंवा पहिल्या कडव्याच्या पुढे मला रचा येत नव्हतं. माझ्या ते लक्षात आलं नाही. कथा-कविता करणं सोपं आहे. अगदी फालतू काम आहे. खरं कठीण म्हणजे मोठे निबंधवजा पुस्तक लिहिणं. एखाद गंभीर विषय घेऊन ग्रंथ तयार करणं. लिहिलं तर तसं लिहावं. भुक्कड लिहिण्यात अर्थ नाही. असे तेव्हा माझे विचार होते. त्या वेळी मी सोळाएक वर्षांचा होतो. मी कथा किंवा कविता लिहून पाहिली नव्हती. गंभीर विषय लिहावे तर ते लिहिण्याइतकं वाचन नव्हतं. काहीच वाचन नव्हतं. मी धुळ्याला टेक्निकल स्कूलमध्ये शिकत असताना एक दिवस आमच्या मित्रांत पैज लागली. गोष्ट लिहिण्याबद्दल. मी म्हटलं, “गोष्ट लिहिणं सोपं आहे. कुणीही गोष्ट लिहील.” गाडीत माझ्या मनात आलेला विचार मी सांगितला. एक मित्र म्हणाला, “शक्य नाही. तुला जमणार नाही. लिहून दाखव. फार अवघड आहे ते काम.” मी म्हटलं, “पैज.” तो म्हणाला, “गोष्ट लिहिशील. पण रद्दड लिहिशील. जर ती प्रसिद्ध झाली तर गोष्ट.” मी जोरानं पुन्हा म्हटलं, “पैज.” मला कल्पना नव्हती की या मित्रानं गोष्टी लिहून, पाठवून प्रसिद्ध करण्याचा यत्न केला होता. त्याच्या गोष्टी परत आल्या होत्या. तो म्हणाला, “पैज! रुपयाची. मात्र गोष्ट प्रसिद्ध झाली पाहिजे.” मी म्हटलं, “ठीक. गोष्ट लिहिणं फालतू आहे.” मित्र म्हणाला, “मग लिही. मासिकात आणून दाखव. रुपया हरेन.” त्या वेळी रुपया फार मोठा होता. म्हणजे ही पैज विद्यर्थिदशेत फार मोठी होती. पैज ठरली आणि मी गोष्टीच्या मागे लागलो. त्या वेळी मी कथा-कादंबऱ्या वाचणं कमी दर्जाचं समजत होते. माझं ते वाचन नव्हतंच. कुठे इकडेतिकडे मासिकं चाळली असतील इतकंच. तेव्हा ‘किर्लोस्कर’-मासिक काय ते माझ्यासारख्या बाहेरच्यांना ठाऊक होते. ‘रत्नाकर’ होते की नाही आठवत नाही. पण ‘मनोरंजन’ असावे. मला वाटतं नुक्ताच एकानं ‘प्रतिभे’चा अंक दाखवला होता. पण ‘कर्लोस्कर’ पुढे मात्र अगदी क्षुल्लक वाटला. अगदी साधा आणि आतला वाङ्मयीन मजकूर तर माझ्या डोक्यावरून गेला. कोण वाचत असेल हा. ज्याने मला दिला त्याच्यासारखा सबंध धुळ्यात एखाद-दुसरा. आजची ‘सत्यकथा’ तरी त्या मानाने पुष्कळ वाचली जाते. त्या गृहस्थाला मात्र ‘प्रतिभे’चे फार कौतुक. तो कुठे बाहेर पडला तरी फिक्यापोपटी रंगाच्या कव्हरचा तो अंक त्याच्या हातात असावयाचा. मुद्दा हा की कोणत्याही वाङ्मयीन प्रवाहापासून मी त्या वेळी शेकडो मैल दूर होतो आणि बुद्धिबळातील राजा, वजीर, हत्ती, उंट काही ठाऊक नसताना मी बुद्धिबळाचा सामना द्यायला निघालो होतो. मला काय करायचे होते त्या ‘प्रतिभे’शी किंवा ‘किर्लोस्कर’शी. मला फक्त पैजेपुरती एक गोष्ट लिहून दाखवावयाची होती. व ती छापून आणावयाची होती. ते झालं की पुन्हा डार्विन होता, संत होते. तत्त्वज्ञान होते. मला जो मोठा प्रबंध लिहावयाचा होता तो होता. तातडीने मी गोष्टीचा विचार करू लागलो. गोष्ट कशावर होईल? गोष्ट कशी असते? सुरवात कशी करतात? मी मूलभूत प्रश्न विचारू लागलो. जवळजवळ मुळाक्षरं शिकवण्यापासून सुरुवात करावी तसे ते होते. मी मनाशी म्हटलं, एखादी घटना हवी. कोणती? नदीवर फिरायला गेलो-यात काय सांगणार? आगगाडी चांदण्यातून धावत होती? पुढे काय? लवकरच माझ्या ध्यानात आलं असं वर्णनात्मक उपयोगाचं नाही. तिथं माणसं हवीत. कुणीतरी नायक हवा. नाटकाप्रमाणे. नायिका हवी. काहीतरी व्हायला हवं. काय होणार? मला काही सुचेना. मी भोवतालचे माझे मित्र. मी पाहत असलेल्या मुली डोळ्यापुढे आणू लागलो. शाळेत जायचं, अभ्यास करायचा, परत यायचं, खेळायचं. कुठे काहीच नव्हतं. मला माझ्या वयाच्या आसपासच्या मुलामुलींशिवाय दुसऱ्या वयाचे लोकही तेव्हा मनात आले नाहीत. दुसऱ्या वयाचे लोक होते. माझे वडील होते. ते मला महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवीत होते. आई होती पण मी धुळ्याला यायला निघालो की लाडू, तूप वगैरे देत होती. दुकानदार होते ते मला हव्या त्या वस्तू द्यायला होते. शिक्षक शिकवायला होते. ही मोठी माणसं फक्त नाना उपयोगाची होती. गोष्टीजोगी नव्हती. लहान मुलांचा तर विचारत नको. रडणारी, उगीच धावणारी, पडणारी, शेंबडी! मुलांत गोष्टीजोगं काय मिळणार? कुठं काही गोष्टीजोगं घडत नव्हतं. गोष्टीजोगं माणूस नव्हतं. मी हताश झालो. असे दोन दिवस गेले. फार वाईट गेले. पैज हरणार की काय वाटू लागले. आधी गोष्ट सुचायला हवी. मग ती लिहून व्हावयाला हवी. मग मासिकाने ती घ्यायला हवी. कसं जमणार? तेवढ्यात मला मुलींच्या लग्नाचं आठवलं. आमच्या घरी किंवा शेजारी मी मुलीला दाखवायला नेलेलं, मुलीच्या लग्नाचा गंभीर विचार चालू असलेला, इतर मुलांप्रमाणे, पुष्कळदा पाहिला होता. तो एक प्रसंग हलवणारा, गोष्टीजोगा होता. माझ्या वयाच्या मुलींची तेव्हा लग्ने होऊन जात. मुली दाखवाला जात. नकार येत. एकदम माझ्या डोक्यात आलं – ‘समजा मुलगी दाखवली. तिला नकार आला. आणि ती नंतर पसंत झाली व लग्न ठरले.’ मी अधिक विचार करू लागलो. समजा, एका मुलाचं नि मुलीचं बाहेर जुळलंय. घरी मुलासाठी मुलगी पाहणं चालू आहे. त्यांना या प्रेमाचा पत्ता नाही. घरून ते मुलाला मुली दाखवायला सारखे बोलवीत असतात. तो वैतागतो. त्याला आपल्या प्रेमाबद्दल सांगायचा धीर होत नाही. तेवढ्यात हीच त्याची मुलगी त्याला सांगून येते. अर्थात त्याला मुलीतं नाव-आडनाव वगैरे आधी कळत नाही. (त्या काळात तसं होई) आणि याही सांगून आलेल्या मुलीला नकार देण्याचा निश्चय करून तो घरी जातो. आणि काय? आश्चर्याचा सुखद धक्का वगैरे. या मुलीवरचे त्याचे प्रेम ठाऊक होऊन त्याच्या बहिणीने हा बनाव घडवून आणला असे केले तर दुधात साखरच. झालं. मी गोष्ट लिहायला बसलो. नाव दिलं – ‘नाकारलेले स्थळ’, मला ठाऊक नव्हतं की या तऱ्हेच्या पाच-पन्नास गोष्टी पूर्वी लिहून झाल्या होत्या. अजूनही लिहिल्या जात होत्या आणि पुढेही लिहिल्या जाणार आहेत. वातावरण बदलेल, भाषा बदलेल, नावे बदलतील. मुद्दा तोच. पण तेव्हा मला ती ‘ओरिजनल’ वाटली. पण खरं म्हणजे ‘ओरिजनल’ वगैरे काही कळक नव्हतं. मुद्दा-गोष्ट पैजेप्रमाणे लिहून होत होती. आणि दोन दिवसांत ती लिहून झाली. ती होताच मी शपथ घेतली पुन्हा गोष्ट लिहिणार नाही. काय हा वाया वेळ! त्या वेळात माझा दहा पाने डार्विन वाचून झाला असता. आता पैजेचा दुसरा भाग प्रसिद्धी. आधी ती गोष्ट पैज मारलेल्या मित्राला वाचायला दिली. मग दोघेही ती कुठे पाठवावी याचा विचार करू लागलो. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ मासिके डोळ्यासमोर होती. त्यातले ‘स्त्री’ मासिक आम्ही निवडले. कारण गोष्ट ‘स्थळा’विषयी नव्हती का? पण संशय आला – दोघांना आला – पुरुष लेखकाची गोष्ट ‘स्त्री’ मासिक स्वीकारील का? तेव्हा दोघांनी ठरवलं की ती मुलीच्या नावानं पाठवावी. मुलगी कोण? तेव्हा माझ्या धाकट्या बहिणीच्या नावाने ती धाडायचं ठरलं. ती आमच्या गावी होती. तीनशे मैल दूर. गोष्टीवर लिहिलं – ‘लेखिकाः शरयू बाळकृष्ण मोकाशी.’ पत्ता ती होती त्या आमच्या गावचाच दिला. महिने गेले. आम्ही गोष्टीचं विसरूनही गेलो. मी डार्विन वाचू लागलो. मग परीक्षा आटोपून मी घरी, गावी गेलो. मला गोष्टाबद्दल घरी काही आलांय का हे विचारायची आठवणही राहिली नाही. मग एके दिवशी ‘स्त्री’ मासिकाचा अंक घरातल्या कोपऱ्यात पडलेला दिसला. मी तो सहज उघडला. त्यात ‘नाकारलेले स्थळ’ : ले.-कु. शरयू बाळकृष्ण मोकाशी – अशी गोष्ट मोठ्या दिमाखात दिसली. मग मी आईला विचारले. आई म्हणाली, “आम्हाला कळेच ना काय भानगड आहे. अंक आला. मग पाच रुपये आले.” आई-वडिलांना कोडे पडले ते बरोबर होते. कारण माझी धाकटी बहीण फक्त अकरा वर्षांची होती. या गोष्टीनंतर मी जवळजवळ चौदा वर्ष गोष्टी लिहिण्याचे मनातसुद्धा आणले नाही. पुढे दोन वर्ष डार्विन वाचण्याचा यत्न करीत राहिलो. मग तोही सोडला.

लेखक- दि. बा. मोकाशी

(अंक – ललित – मार्च, १९७५)  

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

ललित , अनुभव कथन
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. mpbhide1

      4 वर्षांपूर्वी

    पुनश्च ... पासून अवांतर पर्यंत सर्व गटांचे स्पष्टीकरण 'बहुविध विषय' ह्यामध्येच दिल्यास सोपे जाईल.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen