नियतीलाही मदत लागते

पुनश्च    व पु काळे    2018-01-09 06:00:43   

अंक - निवडक कालनिर्णय – १९७३-२००९

काही माणसं जन्माला येतानाच ‘सुखी माणसाचा’ वॉश अँड वेअर सदरा घालून येतात. ‘वॉश अँड वेअर’ असं म्हणायचं, पण या थोर लोकांनाही गरज पडणार नाही असे यांचे योग. किंवा तशी गरज पडलीच तर लाँड्रीचे दुकान यांच्या इमारतीत तळमजल्यावर असतं. वरच्या मजल्यावरून नुसत्या टाळ्या वाजवल्या तरी या महाभागांना एकदम ‘तव्यावरची पोळी’ म्हणतात, त्याप्रमाणे गरम गरम कपडा घरपोच मिळतो. यांचा वाणी घरपोच सामानात साध्या दळलेल्या मिठाच्या ऐवजी चुकूनही ‘खडे मीठ’ पाठवणार नाही. या सुखी माणसांना ‘मिठाला जागवणारा’ फक्त वाणीच भेटतो असं नाही, तर खुर्च्यांना वेत बसवून देणाराही, दिलेल्या तिथीवर काम करून देणारा भेटतो. पावसाळ्यात ह्यांची घरं नेमकी ‘पलंग ठेवला’ तिथं गळत नाहीत. घराला नवीन रंग दिल्यावर भिंतीला टेकून डोक्याच्या तेलाचे भिंतीवर नकाशे उठवणारे पाहुणे या सुखी माणसांच्या घरी येत नाहीत. डबेवाल्याकडून या मंडळींचा डबा कधी बदलून दुसऱ्या पत्त्यावर जात नाही. सुखी माणसांची मुलं नाकात चिंचोका अडकवून घेत नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांना दातांचाही त्रास होत नाही. या माणसांची बुशशर्टची बटन्स जशी संपावर जात नाहीत त्याचप्रमाणे घाईत असताना चपलेचा अंगठाही ‘अचानक’ हाफ-डे कॅज्युअल घेत नाही. या पुण्यवंतांना चष्म्याचा नंबर पहिल्याच फटक्यात अचूक देणारा चष्मेवाला भेटतो. या असामी जर कधी सिनेमाला गेल्या तर उंच मानेचा माणूस यांच्याच खुर्चीसमोर येत नाही. इतकेच नव्हे तर मध्यंतरात यांनी जर शेंगदाणे घेतले तर त्यातला शेवटचा दाणा खवट निघत नाही. रेल्वेस्टेशन या मंडळींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असतं तर बसस्टॉप कुजबुजण्याच्या अंतरावर असतो. या महाभागांच्या घराजवळ नुसतीच ‘इंडियन एअरलाइन्स’ची बस थांबते असं नाही तर पोस्टाची मोबाईल बस योजना ‘भारत सरकारनं’ या जमातीसाठी सुरू केली असावी अशी शंका येते. सुखी माणसांची सासुरवाडी यवतमाळसारख्या लांबच्या गावी असते. पण बायकोचा मामाच असिस्टंट स्टेशनमास्तर असतो, त्यामुळे तिकीट घरपोच.

अशा मोजक्याच भाग्यवंतांपैकी एक, किंबहुना एकमेव असा दिनेश वाईकर. हा राहतो त्या इमारतीसमोर फिरत्या पोस्टाची गाडी नुसतीच येऊन उभी राहत नाही तर त्या गाडीतला एक कर्मचारी वाईकरांच्या घरी येऊन पत्रं गोळा करून नेतो. आयुष्यात इतर गोष्टी लाभल्या तरीही घरमालक लाभणं म्हणजे शनिचा खडा लाभण्यासारखं. वाईकर त्या बाबतीतही भाग्यवान ठरलाय. इतर भाडेकरूंपेक्षा त्याला जास्त सवलती मिळतात. वाईकरांचं एस. टी. मध्ये कुणीही नात्यातलं नाही, पण तिथंही त्याला रांगेत उभं राहण्याची पाळी येत नाही. किंबहुना रांगेचा शाप त्याला कुठेही भोगावा लागलेला नाही. एक डॉक्टर तसा अनेकांचा फॅमिली डॉक्टर असतो. पण त्या बाबतीतही चौकोनी चेहरा करून त्याला कधी वेटिंग हॉलमध्ये थांबायची पाळी आली नाही. केव्हातरी खनपटीला बसून मी त्याला विचारलं, “तुझं गोत्र अत्री का?” “मी कधी गोत्राचा विचारच केला नाही. मध्येच तुला गोत्र का आठवलं?” “अत्री म्हणजे सगळ्यांशी मैत्री, असा एक वाक्प्रचार आहे.” “मला कुठे खंडीभर मित्र आहेत!” “खंडीभर नसतील. पण तू माणसं जिथं जिथं जोडलीस ती सगळी तुझ्यासाठी झटतात.” “तसा मी भाग्यवान आहे, पण...” “काय झालं? ...” “यातली काही भाग्य कष्टसाध्य आहेत.” “म्हणजे कशी?” “आता आमचे मालक इतरांपेक्षा माझ्यावर जास्त लोभ करतात.” “तेच. कसं?” “सांगतो. दर महिन्याला एक तारखेला मालकांचा भय्या सकाळी आठ वाजता दारात हजर होतो. दोन वर्षांपूर्वीची हकीकत. मालकांचे वडील आजारी आहेत असं मला समजलं. मी संध्याकाळी मालकांच्या घरी गेलो. वडिलांची चौकशी केली. काही मदत लागली तर कळवा म्हणालो ‘अधूनमधून गप्पा मारायला येत जा, त्यांना एकटं वाटतं.’ असं मालक म्हणाले. मी मग एक दिवसाआड रोज संध्याकाळी मालकाकडे महाभारत वाचून दाखवायला जाऊ लागलो. मला केव्हातरी समग्र भारत वाचायचं होतंच. ते मालकांच्या वडिलांना वाचून दाखवायच्या निमित्तानं झालं तरी. नाहीतर निष्कारण चालढकल करण्यात आपण खूप आयुष्य वाया घालवतो. महाभारतानंतर रामायणाचा विचार होता. पण त्यापूर्वी मालकाचे वडील गेले. तेव्हापासून मालकाचा भय्या दाराशी येईनासा झाला. आपण भाडं थोडंच चुकवणार आहोत. आपल्याला एक-दोन दिवसांची सवलत हवी असते. ती मिळाली. स्वार्थ-परमार्थ...” “तुम्हाला इतका वेळ बरा मिळाला.” “वपु, अशी कल्पना करा. सकाळी आरामात सात वाजता उठायचं. चहा, दाढी, आंघोळ आठ वाजेपर्यंत. नंतर पंधरा मिनिटं चक्क टिवल्याबावल्या. साडेनऊ वाजता साधारणपणे तुम्ही घर सोडत असाल तर सकाळी सव्वा तास वेळ उरतो. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत टिवल्याबावल्या. रात्री नऊला जेवण असेल तर दोन तास मिळतात. नऊ ते साडेनऊ जेवण. पुन्हा दहा वाजेपर्यंत अर्धा तास उरतो. दहा वाजता जनगणमन. रोज पावणेचार तास मिळतात. त्या वेळेचा आपण काय उपयोग करतो? कुणाला तीन तास रिकामे, कुणाला दोन, कुणाला अडीच. पण त्याचं आपण काय करतो? पावणेचार तासांप्रमाणे वर्षात सत्तावन्न दिवस होतात. एका वर्षात आपण दोन महिने वाया घालवतो. मग उभ्या आयुष्यात असं वेस्टेज किती होईल? कॉलेजचा कोर्स होईल, म्हणूनच ‘वेळ मिळत नाही’ म्हणणाऱ्या माणसांवर माझा विश्वास नाही.” मी पटकन म्हणालो, “वाईकर, यू आर ग्रेट.”

“ग्रेट वगैरे असं काही नसतं हो, आणि तसं काही असलंच तर तो ग्रेटनेस मिळवणं अशक्य नसतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून आयुष्य सोपं करता येतं.” “तेच कसं?” “माझ्या घरासमोर पोस्टाची गाडी थांबते. हा भाग नशिबाचा. एकदा धुमधडाक्यात पाऊस पडत होता. मी चहाचा कप घेऊन गॅलरीत उभा होतो. मला एकाएकी त्या व्हॅनमध्ये काम करणाऱ्या माणसांची कीव आली. ती गाडी सुटायच्या आत मी त्यांना किटलीभर घरचा चहा करून पाठवला. त्याची जाणीव ठेवून त्यांचा माणूस घरी येऊन माझी पत्रं न्यायला लागला.” जरा वेळ थांबून वाईकर म्हणाला, “अगदी छोटी छोटी पथ्यं आपण पाळत नाही. आपलं किंवा आपल्या घरातल्यांचं आजारपण संपलं की डॉक्टरची आपण आठवणही ठेवत नाही. माझ्या फॅमिली डॉक्टरला माझं दर महिन्याला एक पत्र जातं. केवळ ख्यालीखुशाली कळवण्यासाठी. आजार बरा झाल्यानंतर आभाराचं पत्र जातं. याउलट आरसीव्हीपीलाही दाद न देणारे महाभाग इथं आहेत.” “तुमचा शब्दनशब्द पटतोय.” “एस. टी. तला पी.आर.ओ. असाच परिचयाचा झाला. मला वर्षातून कमीत कमी चार वेळा एस. टी.नं प्रवास करावा लागतो. ड्रायव्हरनं जर गाडी कौशल्यानं चालवली असेल तर माझं लगेच कौतुकाचं पत्र पी.आर.ओ. ला जातं. ड्रायव्हरच्या नावासहित. सुमारे दोन डझन पत्रं मिळाल्यावर त्यानं भेटायला बोलावलं. ओळख झाली, वाढली. आता नो प्रॉब्लेम.” मी थक्क होऊन बघत होतो. वाईकर म्हणाला, “माणसाला जन्माला घालण्यामागे, त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते. बाकीचं आपण मिळवायचं. दिवसाचे अकरा तास हे हात जर राबले तरच एक तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे. आपणही नियतीला मदत करायची असते. मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत, सगळ्यांच्या. The best helping hand is at the end of your arms.”

लेखक - व.पु. काळे image credit: write angle triangle

Google Key Words - V.P. Kale, Va Pu, Marathi Writer, Kalnirnay

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

कालनिर्णय , चिंतन
ललित

प्रतिक्रिया

 1. Anand24

    4 वर्षांपूर्वी

  Wonderful and compelling us to think about the philosophy of Life. The Best part is the last sentence "The best helping hand is at the end of your arms." The wisest decision I have ever made is that I have become a member of "Punashch." Thanks a lot.for all the beautiful articles, short and sweet.

 2. RParagK

    4 वर्षांपूर्वी

  वपुंचं सगळंच साहित्य पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं आहे. निवड उत्तम.

 3. sansal24

    4 वर्षांपूर्वी

  सोशल मीडिया च्या जगात असा विचार झाला तर प्रेम नाती जिव्हाळा या पुन्हा जिवंत होतील. खूप चांगला लेख, पुनःश्च चे आभार जो वेगवेगळ्या लेखकांचे संग्राह्य लेख तुम्ही आम्हाला वाचायला दिलेत.

 4. Suhasthatte

    4 वर्षांपूर्वी

  गाेष्ट हातातली आहे . फक्त क्रूतीची गरज आहे . व पु दी ग्रेट

 5. arya

    4 वर्षांपूर्वी

  छान!छोट्या गोष्टींतून मोठे लाभ सहज पदरी पडतात. प्रेरक !

 6. rajashreejoshi

    4 वर्षांपूर्वी

  मस्त लेख...सुरुवातीचा काही भाग पु लं च्या धाटणीचा वाटला...आणि मग व पु आले.

 7. varshagokhale

    4 वर्षांपूर्वी

  व पु.ग्रेट! जीवनात सुख मिळवायचे असेल तर काही खर्च करण्याची तयारी ठेवावी!हे तत्व किती छान पद्धतीने दाखवलं!

 8. Dr. Saudamini Gandhi.

    4 वर्षांपूर्वी

  खुपच सुंदर लेख...व.पुं.चे लेख म्हणजे मेजवानीच असते..

 9. vighneshjoshi

    4 वर्षांपूर्वी

  मस्त , उत्तम वपु म्हणजे आपण काय बोलायचं

 10. Rajan Alve

    5 वर्षांपूर्वी

  वपू जीवन जगण हि एक कला आहे, हे ज्याला जमते तोच आनंदी राहतो व आनंद देतो, एका कलाकारा सारखा

 11. aghaisas

    5 वर्षांपूर्वी

  सुंदर कथा. पेराल तसे उगवते ह्या म्हणीचा प्रत्यय देणारी. आपल्या सगळ्यांकडे खूप वेळ असतो आणि इच्छा असेल तर बरंच काही विशेषतः इतरांसाठीही करता येते हे शिकवणारा लेख

 12. Vrushali2112

    5 वर्षांपूर्वी

  अप्रतिम...व पुं ची तुलना होणे नाही..

 13. rahulwagh

    5 वर्षांपूर्वी

  व पु अप्रतिम धन्यवाद

 14. praj9975

    5 वर्षांपूर्वी

  छान! गुणवत्ता वर्धक लेख.

 15. Anant Javkhedkar

    5 वर्षांपूर्वी

  वपुंनि विचार अत्यंत चांगले मांडले आहेत. पण ते प्रत्यशात आणणे अवघड आहे.

 16. mukund ashtekar

    5 वर्षांपूर्वी

  अप्रतिम

 17. Kaashish

    5 वर्षांपूर्वी

  Simple apratim

 18. sush

    5 वर्षांपूर्वी

  खुपच छान लेख

 19. Prashant Mathkar

    5 वर्षांपूर्वी

  पुनश्च मूळे पुन:प्रत्यया चा आनंद मिळाला.. व पु धी ग्रेट

 20. CHARUDATTA SHRIDHAR SHENDE

    5 वर्षांपूर्वी

  simply wonderful ! V.P. is really great !!! He very easily teaches how to make and live life simple.

 21. Parijatk

    5 वर्षांपूर्वी

  नियतीलाही मदत लागते थोडक्यात काय तर... जे हवय त्यासाठी पहिले स्वतः कडून दिल गेलं पाहिजे.कोणतीही गोष्ट या जगात आपल्याला सहजासहजी नाही उपलब्ध होत.मनात चांगली इच्छा ठेऊन जेव्हा आपण सुरूवात करतो तेव्हा समोरून चांगला प्रतिसाद येईल याची अपेक्षा कधीच करू नये...जिथे अपेक्षा रूजू लागते,तिथेच ती वाढत जाते..एक दिवस या अपेक्षांच ओझं इतकं वाढत जात की आपल्याला पेलवत नाही..मग आपण निराश होतो..स्वत:ची, स्वत:च्या परिस्थितीची तुलना नकलत दुसर्याशी,त्याच्या परिस्थीतीशी करु लागतो...असं माझ्या बाबतीत होत,त्याच्या बाबतीत नाही होत असा सारा विचार करून आपणच आपल्या नशिबाला दोष देऊ लागतो...पण हे सारं करण्यापुर्वी त्या व्यक्तीने काय चांगुलपणा केला होता हे आपण कितपत विचारात घेतो?...आपणही स्वत: तेवढाच चांगुलपणा केला होता का याचे आत्मपरीक्षण करायची जास्त गरज आहे...हे सारं योग्य असतानाही काहींच्या वाट्याला निराशा म्हणणे योग्य नाही वाटत पण एक (नकलत) अपेक्षीत ईच्छा राहते अशा बाबतीत श्रीकृष्णाचे वचन आठवून सर्व विसरून जावे"फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करत जावे"?

 22. sudhirdnaik

    5 वर्षांपूर्वी

  Great! Give!! Sukhacha mahaamantr!!! Sudhir Naik Samhita Social Ventures

 23. TUSHAR3412

    5 वर्षांपूर्वी

  वाह...काय मस्त लिहिलंय ! वपुंच्या अनेक पुस्तकांची पारायणे झाली. त्यांचे कथाकथन ऑडिओ त्यांच्याच आवाजात ऐकताना हरवून गेल्यासारखं वाटतं. हे अजून वाचायला मिळालं त्याबद्दल पुनश्च चे धन्यवाद....! ?

 24. san

    5 वर्षांपूर्वी

  very inspiring article.

 25. vivek

    5 वर्षांपूर्वी

  vyakti aani niyati aani karmavadatil anand

 26. राजेश रोकडे

    5 वर्षांपूर्वी

  छानच. ब-याच दिवसांनंतर वपुचा लेख वाचायला मिळाला. मनपुर्वक धन्यवाद .

 27. shubhada.bapat

    5 वर्षांपूर्वी

  छानच

 28. dr_anandgj

    5 वर्षांपूर्वी

  Great !

 29. श्रीरंग खटावकर

    5 वर्षांपूर्वी

  खूपच छान

 30. किरण भिडे

    5 वर्षांपूर्वी

  प्रयत्न चाललेत त्यावर...लवकरच तोडगा मिळावा...

 31. Dr Anil Sant

    5 वर्षांपूर्वी

  Is it possible to have on audio book in the voice of original author ?

 32. मंजुषा

    5 वर्षांपूर्वी

  खूप सुंदर!

 33. smita mirji

    5 वर्षांपूर्वी

  sundar, apratim

 34. Vilas Bendale.

    5 वर्षांपूर्वी

  Vasant Purshottam Kale is great human analyst and thinker. He is very sharp and nice about human mind. By profession architect but she has done very deep study of general minds.

 35. किरण भिडे

    5 वर्षांपूर्वी

  देवेन्द्रजी, नमस्कार. तुमची 'नियतीलाही मदत लागते' या लेखावर टाकलेली कमेंट वाचली. तुमचे इरिटेशन स्वाभाविक आहे. पण असं का होत आहे हे सांगण्यासाठी हा मेलप्रपंच... हा जो लेख आहे तो 'अवांतर' या सदरातील आहे. खरंतर सशुल्क सभासदत्व या कन्सेप्ट मध्ये असा लेख एकदम misfit आहे. लेख पैसे देऊनच वाचायचे आहेत तर मग अशा फुकट लेखांची गरजच काय? पण देवेन्द्रजी, ही मार्केटिंगची गरज आहे. कारण कुठलाही नवीन कन्सेप्ट आला की तो स्वीकारणारे तुमच्यासारखे 'early adopters' कमी असतात. शंका घेणाऱ्यांची संख्या जास्त. त्यातही आपल्या समाजात ज्ञान 'विकत' घेण्याची 'समज' कमीच. त्यामुळे असे 'फुकटचे' लेख वाचायला देऊन नवीन सभासदांना जोडून घेणे हा यामागील हेतू आहे. त्यामुळे प्रत्येक 'अवांतर' उर्फ 'फुकट' लेखाखाली आपण वाचलेला परिच्छेद देणे ही मार्केटिंगची गरज आहे. चांगला 'फुकट' लेख वाचल्यावर आपल्या दर्जा आणि हेतूबद्दल खात्री पटून वाचकांनी पुनश्चचे 'सशुल्क' सभासद व्हावे अशी योजना आहे. सध्या आपण सशुल्कचे सभासद आणि सशुल्क + ब्लॉग्स चे सभासद अशी विभागणी app वर का होईना करू शकलो आहे. हे दोन्ही विभाग 'अवांतर' पासूनही वेगळे काढता येतील. पण मग सशुल्क सभासद 'अवांतर' लेखांना मुकतील. आपण 'अवांतर' लेखही खूप मेहनत करून निवडून आपल्यापर्यंत पोचवत असतो. म्हणून सशुल्क सभासदांना त्यापासून वंचित ठेवणे आम्हाला पटत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय ती कटकट आहे हे मान्य करूनही जोपर्यंत नवीन कल्पना सुचत नाही तोवर ती करणे भाग आहे. देवेन्द्रजी, आपण तंत्रज्ञान या क्षेत्रातले जाणकार आहात. तुम्ही तुमच्या पहिल्या मेल मध्ये तसे सांगितले होते ते माझ्या लक्षात आहे. तुम्हाला यावर काही उपाय सुचत असेल तर सांगा. आपण जरूर त्यावर विचार करू. देवेन्द्रजी, अजून एक गोष्ट. तुम्ही चुकून दोनदा पैसे भरलेत. ते आम्हाला मिळाले आहेत. त्या २०० रुपयात आम्ही आपणास सशुल्क ( १०० रुपये ) चे सभासदत्व आहेच, अधिकचे दोन्ही ब्लॉग्स( ५०+५०=१०० रुपये ) चे सभासदत्व देत आहोत. म्हणजे आपला हिशोब चोख :-) चालेल ना? असं न विचारता थोडा आगाउपणा करतोय. राग मानू नये. आणि हो, तुमच्या अनुभवाचा आम्हाला फायदा झाला तर हवाच आहे.

 36. Devendra

    5 वर्षांपूर्वी

  पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का? Coz of your programmers' mistakge, I had to pay the fees twice - once online and by netbanking as well. Still I am getting such message every after reading any damn article. If your programmers can not handle this technically, replace them, however, do not show such messages and activate my "active" membership as you have received my payment twice. Login name - Devendra

 37. Aparna

    5 वर्षांपूर्वी

  Too good...thank u punascha ...

 38. Janhavi B

    5 वर्षांपूर्वी

  छान आहे लेख.

 39. गणेश

    5 वर्षांपूर्वी

  "दिवसाचे अकरा तास हे हात जर राबले तरच एक तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे"

 40. कल्याण देशमुख

    5 वर्षांपूर्वी

  आयुष्याकडे नव्याने बघण्याची उमेद व.पु मुळे मिळते

 41. sspurandare

    5 वर्षांपूर्वी

  व.पु. काळे या साहित्यसम्राटापुढे माझे लाख लाख प्रणाम

 42. उमेश जोशी.

    5 वर्षांपूर्वी

  व.पुं. चा लेख पण पु.लं.च्या लेखनाचाही भास झाला. वयाच्या अवघ्या चाळीशीत? असा उद्बोधक लेख वाचनात येणं....अन् नियतीला मदत करत अशा भाग्यवानांच्या टोळीत सामिल होण्यास धडपडण्यासाठी अजून वीस वर्ष मिळू शिकतात असं वाटण्यास वाव असणं .....म्हणजे ..... हे ही नसे थोडके ......?

 43. Amogh

    5 वर्षांपूर्वी

  सुंदर लेख. .. आवडला. ..

 44. मयुर बेलोकार

    5 वर्षांपूर्वी

  खूप छान

 45. मुग्धा भिडे

    5 वर्षांपूर्वी

  very nice

 46. Snehal

    5 वर्षांपूर्वी

  सुख असच असत..कमवाव लागत ..पैशाने नाही तर परोपकाराने...kharach sundar lekh

 47. मुग्धा भिडे

    5 वर्षांपूर्वी

  आज खूप वर्षांनी व. पु. ना पुन्हा एकदा वाचलं . आमच्या पिढीवरचं त्यांचं गारूड पुन्हा एकदा अनुभवलं. खूप मजा आ। हा विचार फक्त व. पु. च करू शकतात

 48. Shubhada

    5 वर्षांपूर्वी

  Nice

 49. चिंतन जोग

    5 वर्षांपूर्वी

  संपूर्ण वपु वाचले की कसं जगावं हा प्रश्न आपोआप सुटलेला असतो

 50. मिलिंद निमदेव

    5 वर्षांपूर्वी

  वपू खरच ग्रेट !!!!

 51. Vijayshree

    5 वर्षांपूर्वी

  मस्त वाटले हे वाचून. एकदम छान पद्धतीने किती महत्वाचा विचार लोकांपर्यन्त पोहचवला. Thanks for sharing Be always Caring.

 52. Vaibhavacham

    5 वर्षांपूर्वी

  Kharach lekh Khup Chan Ani preranadayee aahe. Lekh wachun anand zala Ani khup Ani veleche Ani daiwache mahatva sudhha spashta zale. Dr Vaibhav Acham

 53. आनंद कोकणे

    5 वर्षांपूर्वी

  खूप छान.अस जगण्याचा थोड़ा तरी प्रयत्न करावा.

 54. Meera Ghayal

    5 वर्षांपूर्वी

  फक्त हे वपुच लिहू शकतात म्हणजे असं वागण्याची आपण कल्पनाच करु शकत नाही. आपण परिस्थिती ने कायम करवादलेले राहू पण हे वाईकर ! त्यांच्या माध्यमातून वपुंनी हे रेखाटलय ! simply great

 55. Hitendra Patil

    5 वर्षांपूर्वी

  अप्रतिम ???????

 56. मनीष गायकवाड़

    5 वर्षांपूर्वी

  खरच छोट्या छोट्या गोष्टी ही मोठ्या भाग्यच्या असतात .कोणतीही अपेक्षा न कोणत्याहीकाशचीही अपेक्षा न ठेवता केलेले काम आनंद देते

 57. jyoti

    5 वर्षांपूर्वी

  khupach sunder . va pu tumhi great ahat ...

 58. संजय पाटील

    5 वर्षांपूर्वी

  छान लेख. दुर्लक्षिलेल्या छोट्या छोट्या चांगल्या कृतींच व त्यांच्या परीणामांच मस्त वर्णन.

 59. ANUP

    5 वर्षांपूर्वी

  जी शैली वपु कड़े आहे किंबहुना पुल आणि अत्रे कड ही नव्हती विनोदात पन एक निरोप आसायच एक गम्भीरतेची किनार असायची जस मीठ आणि साखर एका डब्यात ठेवण्यात यावा अप्रतिम

 60. Amit Borate

    5 वर्षांपूर्वी

  खुप सुंदर...

 61. Dr. Vijaysinh Patil

    5 वर्षांपूर्वी

  मस्तच ,,, व पु ग्रेट,,, Best helping hand is at the end of your arm

 62. अविनाश

    5 वर्षांपूर्वी

  मुळात वाईकरांनी दुसऱ्यांची स्वतःहून मदत केली होती ती पण विना अपेक्षा , त्याचंच फळ त्यांना भेटलं

 63. जया

    5 वर्षांपूर्वी

  हे फक्त व .पु.च लिहू शकतात .आनंद वाटला .

 64. राजेंद्र काशीनाथ खांडेकर

    5 वर्षांपूर्वी

  व पु द ग्रेट !

 65. Prasad Ramakant Joshi

    5 वर्षांपूर्वी

  अप्रतिम

 66. रंगा जोशी

    5 वर्षांपूर्वी

  खुपच सुंदर लेख.....तितकाच विनोदी खुप हसलो

 67. MAHESH PATIL

    5 वर्षांपूर्वी

  Punashcha ह्या मराठी भाषेतील पहिल्या डिजीटल नियतकालिकामध्ये वसंत पुरुषोत्तम काळे यांचा '' नियतीलाही मदत लागते '' हा लेख प्रकाशित केल्या बद्दल वपु चाहत्यांकडून पुनश्च संपादकीय मंडळास धन्यवाद !!

 68. प्रियांका कुंटे

    5 वर्षांपूर्वी

  खूप सुंदर लेख, मजा आली वाचताना

 69. विनायक जोग

    5 वर्षांपूर्वी

  bhari लेखक तसेच आपली निवड

 70. Smita

    5 वर्षांपूर्वी

  अतिशय सुरेख आणि उद्बोधक लेख ... आपल्याला जे लोक भाग्यवान वाटत असतात ते खरं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी वेळ काढून जाणिवपूर्वक करत असल्यामुळे त्यांचे आयुष्य सुकर झालेले असते ...वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen