ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणातील माझे प्रयोग (भाग १)


मराठी अभ्यास केंद्र दरवर्षी डिसेंबर महिन्यात मराठीप्रेमी पालक महासंमेलन आयोजित करत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२०चे हे संमेलन ऑनलाइन घ्यावे लागले. या संमेलनानिमित्त शिक्षकांसाठी ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणातील माझे प्रयोग’ ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्रातील विविध शाळांतील शिक्षकांनी कोरोनाकाळात केलेले प्रयोग निबंधातून मांडले. या स्पर्धतील गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील संजय कानसे यांचा हा प्रथम पारितोषिक निबंध. या निबंधाच्या वाक्यावाक्यांतून दिसते ती, कानसे सरांची आपल्या विद्यार्थ्यांप्रती आणि कामाप्रती असलेली तळमळ! 
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा यांच्या नात्यामध्ये, अध्यापन करताना घडणाऱ्या क्रिया-आंतरक्रिया महत्त्वाच्या  असतात. मुलांचं कौतुक करताना, समजावून सांगताना, प्रसंगी चुकल्यास त्यांना दटावताना, आपली प्रत्येक हालचाल बोलत असते. आपण शिकवलेलं विद्यार्थ्यांना कितपत कळलं, हे त्यांचे लुकलुकणारे इवलेसे डोळे पाहून लगेच कळतं. ऑनलाइन शिक्षणातील आभासी अंतर मात्र ह्या सर्व आंतरक्रियात अडथळा ठरतं.
प्रयोग म्हणजे एक प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलेले प्रयत्नच! हे प्रयत्न यशस्वी झाले तर असे प्रयोग यशस्वी ठरतात. जिथे विद्यार्थी-पालक घनता जास्त आहे, तिथे शिक्षणाचे प्रयोग करायला जास्त वाव असतो. कोणी ट्रेनचे डब्बे शाळेत आणून, तर कोणी झाडाखाली शाळा भरवून, तर कोणी काचेच्या वर्गात शाळा भरवून, शिक्षणाचे प्रयोग करत आहेत. या अशा प्रयोगांमुळेच शिक्षण ही एक जिवंत प्रक्रिया आहे. विषय आवडण्यासाठी शिक्षक आवडणं गरजेचं आहे, हे शिक्षक जाणून असतो. आपण मुलांना आवडावं म्हणून प्रत्येक शिक्षक काही ना काही प्रयोग करत असतो. सध्याच्या घडीला प्रयोग करणाऱ्या, त्याचा प्रसार करणाऱ्या आणि या सगळ्याचा चांगला परिणाम घडवून आणणाऱ्या प्रयोगशील शाळा घट्ट पाय रोवून टिकून आहेत.
ऑनलाइन तासांना माझ्या वर्गातील सर्व मुलांनी शंभर टक्के उपस्थिती लावली म्हणून मंडळाने माझा २३ ऑक्टोबर २०२० रोजी सत्कार केला. सत्कार व्हावा म्हणून काही मी हे केले नव्हते, तर आत्मसमाधानासाठी केले होते. माझ्या कॅटलॉगमधील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेला माझ्या हृदयाला आवडणार नव्हतं, म्हणून माझा निश्चय होता, शंभर टक्के विद्यार्थी अभ्यासाच्या प्रवाहात आणणं. खरंतर ऑनलाइन शिक्षण गरीब मुलांपर्यंत किती पोचेल हे माहिती नव्हतं, पण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लावणार, ही खूणगाठ मी जून महिन्यातच बांधली होती. मागील तीन महिने केलेल्या प्रयत्नांचा धावता चित्रपट डोळ्यांसमोरून गेला आणि डोळ्यांतून टचकन पाणी आलं. प्रयत्न यशस्वी झाले होते, आता यांना प्रयोग म्हणायला हरकत नव्हतं. लॉकडाउनच्या काळात सर्वच शिक्षक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करत होते. कोणी व्हिडीओ बनवत होतं, तर कोणी व्हिडीओ शोधत होतं, कोणी यूट्युब, झूम, गूगल मीट, गूगल ड्युओ, गुगल फॉर्म या तंत्रज्ञानावर काम करत होतं. व्हिडीओ शूट करत असताना, कपडे सुकत घालण्याचा चिमटा वापरण्याची माझी कल्पना सहकारी शिक्षकांना फार आवडली होती. माझ्यातील अत्यंत दुर्दम्य सकारात्मक इच्छाशक्ती, चौकटीबाहेरचा विचार करून दररोज नावीन्यपूर्ण वेगळे प्रयोग करण्याचा छंद, तसेच खडतर आव्हान स्वीकारायचा माझा अभिजात गुण, यांमुळे ऑनलाइन शिक्षणाच्या वेळेस आपण वेगळं आव्हान स्वीकारायचं माझ्या मनात आलं. आपल्या वर्गातील शंभर टक्के मुले अभ्यासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांशी संवाद साधून भावनिक साद घालायची, हे मी ठरवलं.
जून महिन्यात मला ‘पाचवी-अ’चे वर्गशिक्षक पद देण्यात आलं. थोडा आनंदातच होतो, कारण मागील पंचवीस वर्षात, मला माझी आवड म्हणून व शाळेची सोय म्हणून ‘ब’ किंवा ‘क’ वर्गाचे वर्गशिक्षक पद मिळत असे. मात्र ‘पाचवी-अ’चा वर्ग मिळाल्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. मला मिळालेला इयत्ता ‘पाचवी-अ’चा वर्ग कधी न पाहिलेल्या प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये येणारा, बिनचेहऱ्याचा होता. इतर शिक्षकांना गेल्या वर्षीच्या वर्गांचे वर्गशिक्षक पद मिळाले होते. खरंतर असे दुसऱ्याच्या कामाशी तुलना करून, दुःख करून, नीट शिकवता येणार नाही, हे मला माहीत होतं; म्हणून मी कोणतीही कुरबूर केली नाही. मुख्याध्यापकांनी इयत्ता ‘पाचवी-अ’च्या वर्गातील ३७ मुलांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनविण्यास सांगितले. प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सॲप ग्रुप बनविण्याची कल्पना मीच दोन वर्षांपूर्वी, पूर्वीच्या मुख्याध्यापकांना दिली होती. त्यांनी ती कल्पना उचलून धरली व लगेच अमलात आणली होती. पण, त्याचा उपयोग या लोकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी होईल, हे तेव्हा स्वप्नातही वाटले नव्हते. शाळा जरी १६ जूनपासून ऑनलाइन सुरू होणार होती, तरी ५ जूनपासूनच माझ्या कामाला सुरुवात झाली. एखादं काम यशस्वी करायचं असेल तर ऐंशी टक्के पेपरवर्क व वीस टक्के नियोजनबद्ध मेहनत घेणं गरजेचं आहे, हे मी जाणून होतो. कोणतंही काम यशस्वी करायचं असेल तर नेतृत्वगुण अंगी असलेच पाहिजेत व त्यासाठी आवश्यक निर्णयस्वातंत्र्य मिळणं फार महत्त्वाचं आहे. येथे मी वर्गशिक्षक म्हणून वर्गाचा राजा होतो. घरातूनच ऑनलाइन काम करायचं असल्यामुळे कोणी माझ्या कामात ढवळाढवळ करणार नव्हतं. काम यशस्वी करायचं असेल तर त्या कामावर शंभर टक्के फोकस करणं गरजेचं होतं; म्हणून मी तीन महिने बालवैज्ञानिक, गणित-प्राविण्य, नवनिर्मिती व बिल्डिंगच्या सोसायटीच्या कामाकडे थोडा कानाडोळा केला. १६ जूनला ऑनलाइन शिक्षण सुरू होणार होतं, तरी १० जूनला मी वर्गातील ३७ मुलांचा कच्चा कॅटलॉग बनवून तयार होतो. त्यात मुलांचं पूर्ण नाव, मोबाइल नंबरसाठी दोन-तीन रकाने, पत्ते व जन्मतारीख असे गण पाडले होते. गोरेगाव पूर्वेचे विविध विभाग दर्शवणारा एक नकाशा तयार केला. वर्गातील ३७ मुलांना फोन केले आणि ‘प्रथमग्रासे मक्षिकापातः’ या उक्तीप्रमाणे माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. सदोतीसपैकी केवळ वीसच विद्यार्थ्यांना फोन लागले. एक वेळ एखाद्या खेड्यातील वर्गशिक्षक असणं परवडलं असतं. पण, माझ्या वर्गातील मुलांपैकी कुणी आरेतील आदिवासी पाड्यात, तर कोणी रेल्वे फाटकाजवळ झोपडपट्टीत, कोणी कामा इस्टेटच्या मिनी धारावीत, तर कोणी जिल्ह्याबाहेर-राज्याबाहेरपण गेलेले होते. त्यातील दोन मुली तर रायगडमधील निसर्ग चक्रीवादळातील संपर्क तुटलेल्या जिल्ह्यात गेल्या होत्या. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या त्या सुरुवातीच्या भयाण वातावरणात कोणी कोणाला कुठे जातो हे सांगून गेलं नव्हतं. सर्व ३७ विद्यार्थ्यांचे मोबाइल नंबर मिळवून, संपर्क साधण्यासाठी एक महिना मला तारेवरची कसरत करावी लागली. सुरतला राहायला गेलेल्या मुलाचा नंबर शोधण्याची हकिकत लिहिली तर आणखी एक पान भरेल. मागील दोन वर्षे मुले वाढावी म्हणून गल्ली-गल्लीमध्ये फिरण्याचा मला या वेळी भरपूर फायदा झाला. कोणता मुलगा कोणत्या नगरमध्ये राहतो, हे फोनवरून अंदाज बांधू लागलो; व काढलेल्या नकाशात हायलाइट करू लागलो.
जुलै अखेरपर्यंत, एक-एक करून सर्व मुलांशी फोनवरून संवाद झाल्याने हायसे वाटले. फोनवर संवाद साधत असताना, ‘कसे आहात? काळजी घ्या’ अशी घरातील सर्वांची विचारपूस करून, शेवटी मुलांच्या अभ्यासाबाबत विचारत असे. त्यामुळे पालक व माझ्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. वर्गातील दोन मुलांच्या कुटुंबांत दुर्दैवाने कोरोनाने शिरकाव केला होता. त्यांना मी फोनवरून आधार देत होतो. मानसिक तणावाने विस्कटू पाहणाऱ्या दोन कुटुंबांतील पती-पत्नींना समजावून एकत्र आणले. एका पालकाला एफवायबीएनंतरच्या पुढील शिक्षणासाठी स्फूर्ती दिली. माझ्या सततच्या फोनमुळे एक कुटुंब गावावरून मुंबईला परत आले. शाळा सुरू झाली नाही म्हणून माझ्यावर रागावले, पण मुंबईला आल्याने नोकरी वाचली म्हणून माझे आभार मानू लागले. फोनवर गप्पा मारत-मारत घरातील व शेजार्‍यांचे दोन-चार मोबाइल नंबर मिळवू शकलो. माझ्या घरातील कॅलेंडरवर मी वर्गातील मुलांचे जन्मदिवस साजरे करण्यासाठी त्या-त्या तारखांना हायलाइट करून ठेवले आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्या-त्या मुलांना बालचित्रकार, बालकवी, बालइंजिनीयर अशी उपाधी देऊन, व्हॉट्सॲपवर वाढदिवस साजरे केल्याने मुलांना कोण आनंद होत असे. एवढेच काय, रविवारी सुट्टीच्या दिवशीही मी विद्यार्थी-पालकांच्या संपर्कात राहिलो. ‘कोणतीही अडचण असेल तर मला फोन करा’ या माझ्या व्हॉट्सॲपवरील वाक्याने विद्यार्थी-पालक व माझ्यातील विश्‍वास आणखी दृढ होण्यास मदत झाली.

माझा गणित विषय असल्याने व्हॉट्सॲपवर अभ्यास देताना, कृतींवर जास्त भर दिला होता. टिकल्या वापरून, माचिसच्या काड्या वापरून, रांगोळीचा आधार घेऊन गणिताच्या कृतीमय अभ्यासात मुलांना गुंतवून ठेवले. ‘पिठातून गणित’ हा माझा व्हॉट्सॲप अभ्यास आमच्या मुख्याध्यापकांना फार आवडला. इतर विषय शिक्षकही नावीन्यपूर्ण अभ्यास देत होते, त्याची उपस्थिती वाढवण्यासाठी मदत होत होती. व्हॉट्सॲपवरील अभ्यास करणाऱ्या मुलांची उपस्थिती ग्रुपवर टाकत राहिलो, त्यामुळे स्वतःची उपस्थिती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली. विभागवार पालक-प्रतिनिधी व विद्यार्थी-प्रतीनिधी सुद्धा नेमले. आजूबाजूला राहणाऱ्या इयत्ता ‘पाचवी-ब’च्या मुलांचा अभ्यास करून घेण्याची जबाबदारी माझ्या वर्गातील मुलांवर टाकल्याने, त्यांच्यामध्ये अभ्यास करण्यात चेव निर्माण झाला. अजूनही जी मुले व्हॉट्सॲपवर अभ्यास पाठवत नव्हती, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी गृहभेटी देण्याचे ठरवले. कोरोनाच्या काळात हे काम तितकेसे सोपे नव्हते. या वेळी मी एखाद्या मुलाच्या वाढदिवसाचा प्रसंग शोधत असे. विभाग प्रमुख, विद्यार्थी-पालक यांना फोन करून पूर्वकल्पना देत असे. त्या-त्या विभागातील समाजसेवकांची मदत घेत असे. आणि सोबत पंधरा-वीस चॉकलेट्स घेत असे. ज्या चिमुरड्यांना अभ्यासाचा फोटो काढून ग्रुपवर टाकणे जमत नव्हते, त्यांना मार्गदर्शन करत असे. लहान मुलांना ते पटकन आत्मसात होत असे. रेल्वे फाटकाजवळ राहणाऱ्या एका मुलीच्या झोपडीत तिसऱ्या वेळेला गेलो, तेव्हा ती बापाला बघून आनंदाने धावत यावी, तशी माझ्याकडे आली. आणि मोबाइल कसा ऑपरेट करायचा ते समजून घेऊ लागली. माझ्या गृहभेटीने व्हॉट्सॲपवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली.

सप्टेंबर महिन्यात शाळेने व्हाट्सॲप अभ्यासाबरोबर सायंकाळच्या ऑनलाइन लेक्चरची सुरुवात केली. आता फोरजी व नेट पॅक ही एक वेगळीच समस्या उभी राहिली. परी नवाची हुशार मुलगी स्मार्टफोन नसल्यामुळे अभ्यासाच्या प्रवाहातून दूर जात होती. तिच्या आईशी संपर्क करून स्मार्टफोनसाठी पाच हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र शाळेनेच तिला मोबाइल दिल्यामुळे परी ऑनलाइन लेक्चरला नियमित उपस्थित राहू लागली. आमच्या शाळेतील शिक्षकांनी उभारलेल्या निधीतून मुलांना वह्या, पुस्तके व स्टेशनरी, साधना दिवाळी अंक वाटप करण्यात आले. तसेच ‘शालेय पोषण आहार’अंतर्गत तांदूळ, हरभरा व मूगडाळ वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गरजू व होतकरू मुलांना देणगीदारांनी दिलेल्या निधीतून स्मार्टफोन वितरित केले. पालक-विद्यार्थी प्रत्यक्ष दृष्टीस पडावेत म्हणून या प्रत्येक वाटपाच्या कार्यक्रमाला मी शाळेत आवर्जून उपस्थित राहत होतो. यामुळे ऑनलाइन उपस्थिती वाढण्यास एक प्रकारे मदतच झाली. काही वेळेला त्रास देणाऱ्या दोन-चार मुलांसाठी मी कठोरही बनलो. एका मातेला शाळेकडून स्मार्टफोन मिळाला होता, पण नेट पॅक आठ दिवसानंतर, पगार झाल्यावर टाकते म्हणाल्या. आठ दिवसांचा ऑनलाइन अभ्यास बुडणर होता; म्हणून ‘मी नेट पॅक टाकतो’ असं म्हणालो, पण त्या गरीब माऊलीने मला खर्च करू दिला नाही. शेजारणीकडून उसने घेऊन तिने नेट पॅक भरला व लेकीचा ऑनलाइन अभ्यास सुरू केला. एकाच घरातली दोन मुली ऑनलाइन लेक्चरला दहा-बारा दिवस अनुपस्थित राहत असल्यामुळे माझ्या वर्गाची उपस्थिती ९२ टक्क्यांवर अडकून राहिली होती. तीन मुली लागोपाठ जन्मलेल्या व मुलगा नाही म्हणून या कुटुंबात वेगळीच निरसता आली होती. जुळ्या नसलेल्या त्या दोन मुली अभ्यासात हुशार होत्या. ‘मुली असल्याचे दुःख मानू नका’, असे त्या मातेला वेगळ्या पद्धतीने समजावले. यामुळे प्रगती व संस्कृती ऑनलाइन लेक्चरला नियमित उपस्थित राहू लागल्या. आणि अखेर माझ्या वर्गाने शंभर टक्के उपस्थितीचे शिखर गाठले.
माझ्या वर्गातील मुलं नुसतीच शंभर टक्के अभ्यासाच्या प्रवाहात आली नाहीत, तर निसर्ग मंडळ, शिष्यवृत्ती वर्ग व इतर कोणत्याही स्पर्धेत भाग घेणारी मुलं धाडसी बनत गेली. यासाठी एक प्रसंग येथे नमूद करावासा वाटतो. बीएनएचएसच्या वेबसंवादामध्ये माझ्या वर्गातील काही विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘पाणी व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळा चालू होती. एका मुलाने ‘वाफ होणारे पाणी अडविले पाहिजे’ हे मत व्यक्त केले, तेव्हा मला कौतुकमिश्रित नवल वाटून गेले. ‘दररोज चार-पाच विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्या संपर्कात राहा’, असा मुख्याध्यापकांचा सर्व वर्गशिक्षकांना आदेश होता. पण, माझ्या वर्गात उलटेच होते. माझ्या वर्गातील विद्यार्थीच मला फोन करत होते. आता ते केवळ माझे विद्यार्थी नव्हते, तर माझी मुलं झाली होती. ही जवळीकता-आत्मीयता सर्व शिक्षकांमध्ये रुजेल, तेव्हा सर्वच शाळा नक्कीच बहरलेल्या असतील. माझ्या विभागवार गृहभेटी आता थांबल्या आहेत, कारण प्रत्येक विभागातील माजी विद्यार्थ्यांनी माझी ही जबाबदारी आता हलकी केली आहे. मुलं शिकती होण्यासाठी धडपडणारी पुढची फळीसुद्धा या बिकट काळात नकळत निर्माण झाली आहे. या सुंदर सामाजिक बदलाचा मी साक्षीदार आहे, हेच या सर्व प्रयोगाचे फलित मी मानतो. ‘एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीनुसार कोणतीही अशक्य गोष्ट केवळ शक्यच नाही, तर सहज सुलभ कशी होऊ शकते, हेच माझ्या अनुभवांतून मी शिकलो.
- संजय कानसे
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात गणित विषयाचे शिक्षक आहेत.)

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

शिक्षण , उपक्रमशील शाळा , प्रयोगशील शाळा , ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षण , कोरोनाकाळातील शिक्षण , टाळेबंदीतील शिक्षण

प्रतिक्रिया

  1. Prakash Khanzode

      2 वर्षांपूर्वी

    अतिशय हृद्य अनुभव कथन. अश्या सर्व धडपड्या शिक्षकांचं मनापासून अभिनंदन ????????????????वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen