संपादकीय - मराठी शाळांसाठी पाहिजेत ऐसे शिवाजी अन् ऐसे मावळे!


आजच्या दिवशी मराठी भाषा दिनानिमित्त केवढी तरी विविधांगी मराठीची आळवणी होईल, मात्र आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेत घालणार नसू, अन् तरी दरवर्षी वाढत्या जोशात हा दिन साजरा करणार असू, तर आपण खरंच शिवाजी महाराजांचा वारसा सांगण्यास लायक आहोत का? हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने इतरांना नव्हे, तर स्वतःलाच विचारला पाहिजे. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील गड जिंकून मुळावर घाव घालण्याची रणनीती य़शस्वी केली. इतका उज्ज्वल आयता वारसा  असताना, मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी मराठी शाळा जगवण्याचा मूळ उपाय सोडून; वरवची मलमपट्टी करण्याचा उद्योग आपण का करतो आहोत...?
दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती येते, अन् मग पाठोपाठ आठच दिवसांनी येते २७ फेब्रुवारी ही तारीख, म्हणजे मराठी भाषा दिन. खरं तर मराठी अभ्यास केंद्र ही अशी औपचारिक  दिन साजरे करण्यात मश्गूल होणारी संस्था नव्हे! कारण, महाराष्ट्रात हरएक दिवस मराठीचाच असायला हवा, अशी संस्थेची धारणा आहे. यंदा मात्र शिवजयंतीला एका शाळेच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचं आमंत्रण आलं, आमंत्रण खरं तर मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत यांना होतं, पण चिन्मयीताईंना सोबत म्हणून मलाही शाळा पाहता आली. तर तब्बल आठ दिवसांनी या शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाविषयी सांगण्याचं कारण म्हणजे, हा सोहळा घडवून आणणाऱ्या रंजना चौधरी यांचं अतुलनीय कार्य!
दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा घसरता पट, मोडकळलेल्या किंवा कळा गेलेल्या इमारती, भौतिक साधनांची वाणवा, शिक्षकांची अनुपलब्धता, असलेल्या शिक्षकांना दिली जाणारी शाळाबाह्य कामं, ह्या आणि अशा भाराभर समस्या मराठी शाळांच्या उल्लेखाबरोबर आपल्याला आठवायला लागतील. शिवजयंतीच्या दिवशी आम्ही ज्या शाळेत गेलो, त्या शाळेच्याही अशाच समस्या होत्या; पण, त्या जुलै २०१६ पूर्वीच्या. या वर्षी शाळेत रंजना चौधरी या शिक्षिकेची बदली झाली, अन् तिथून सुरू झाली, शैक्षणिक साधनांनी सुसज्ज अशा या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रवासाची गोष्ट!

रायगड किल्ला हे शिवाजी महाराजांचं राजधानीचं ठिकाण. याच किल्ल्यावर महाराजांनी राज्याभिषेक करून आपलं स्वराज्य जगजाहीर केलं. शिवजंयती आणि शिवराज्याभिषेक या दोन्ही दिवशी गडावर गडाच्या उंचीइतकाच ओतप्रोत उत्साह भरलेला असतो. अर्थात, त्यात गैर काहीच नाही, शिवाजी महाराज या थोर व्यक्तिमत्त्वाप्रती ही आदरांजली खुजीच म्हणावी लागेल, कारण खरं तर महाराजांना यापेक्षा खऱ्या आदरांजलीची अपेक्षा असेल. रायगडाचा उल्लेख इथं आवर्जून करण्याचं कारण म्हणजे, शिवजंयती दिवशी लोकार्पण करण्यात आलेली शाळेची इमारतही याच रायगड जिल्ह्यातील आहे.
रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याप्रमाणे कर्जत तालुक्यातील माथेरान हे थंड हवेचं ठिकाणही सर्वांना परिचित आहे. त्यामुळे माथेरनच्या पायथ्याशी असलेलं नेरळ गावही तितकंच ओळखीचं. मुंबईवरून लोकलने नेरळला जाताना, त्याच्या अलीकडचं स्टेशन म्हणजे शेलू. या शेलू गावाशेजारी बांधिवली हे लहानसं गाव. लहान असलं तरी, मुंबईला अगदी खेटून असल्याने शहरीकरणाचं वारं लागायला कितीसा उशीर! या शहरीकरणाची साक्ष द्यायला गावाभोवतीने कित्येक इमारतींची बांधकामं सुरू असलेली दिसतात. तरीही बांधिवलीचा चेहरामोहरा अजून गावाचाच आहे. वडिलोपार्जित जमिनी विकून गावकऱ्यांच्या गाठीशी पुष्कळ पैसा आला. मग ते वैभव घरांगणात दिसणं ओघानं आलं. पूर्वी अशा वैभवाच्या खुणा घरातल्या स्त्रियांच्या अंगावर सोन्याच्या रूपाने दिसायच्या. जागतिकीकरणात ती जागा दारातल्या मोटारीने आणि मुलांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी घेतली. मुलांच्या शाळांचे माध्यम आणि बोर्ड ही गाडी-बंगल्याप्रमाणे मिरवण्याची गोष्ट झाली. अर्थात, ही काही एकमेव बांधिवली गावापुरती घडलेली घटना नव्हे. तर सबंध महाराष्ट्रात आणि भारतभरच अशा वैभवाच्या पहिला बळी ठरतायत, त्या मातृभाषेतील शाळा! बांधिवली गावही याला अपवाद ठरलं नाही.
गावातल्या एकुलत्या एक जिल्हा परिषदेच्या शाळेतून नेरळच्या चकचकीत इंग्रजी माध्यमात मुलांना घातलं जाऊ लागलं. तिथलं सुट-बूट, टायफाय यांची भुरळ पालकांना पडायला लागली. हे असंच चालू राहिलं असतं तर अडगळीतल्या बांधिवलीची ही झेडपीची शाळा कधी बंद पडली, याचा खुद्द तिथल्या गावकऱ्यांनाही मागमूस लागला नसता. मात्र, २०१६ मध्ये कुणाच्या ध्यानीमनी नसताना बांधिवली गावात रंजना चौधरी यांची बदली झाली अन् मराठी जगतात एक सुखद घटना घडली. खरं तर ती सुखद घटना आहे, याचा तेव्हा कुणालाच अंदाज नव्हता.
रंजना चौधरी यांनी पहिल्याच दिवशी शाळेच्या आवारात पाऊल टाकलं, तेव्हा शाळेची मोडकळीस आलेली इमारत, सोयीसुविधांच्या अभावांचे पाढे यांऐवजी, त्यांचं लक्ष वेधलं गेलं ते शाळेच्या विस्तीर्ण पटांगणाने. कारण, त्याआधी त्या ज्या-ज्या शाळांमध्ये (भिवंडीतील तळवली, डोहाळे, भोकरी आणि पालघरमधील कमारे, निहे) बदली होऊन गेल्या, त्यांपैकी कुठल्याच शाळेत असं भव्य आवार नव्हतं. रंजनाबाईंना नुसत्याच भव्य असणाऱ्या या आवारावर नंदनवन फुललेलं स्वप्नं पडू लागली. अर्थात, ते दिवास्वप्न खचितच नव्हतं! रंजनाबाईंनी आपल्या मनातलं हे स्वप्न मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, गावकरी यांच्यामध्ये तर रुजवायला सुरुवात केलीच, पण आपलं कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी यांचीही या स्वप्नपूर्तीसाठी मदत घेतली.
कुबट वासाच्या अन् कुठल्याही पावसात जमीनदोस्त होऊ शकतील अशा भिंतींच्या आधाराने, खरं तर सरकारी कुबड्यांनी कशाबशा तग धरून असलेल्या सरकारी मराठी शाळा आपण कितींदा तरी पाहिलेल्या असतात; आणि त्या तितक्याच सहज डोळ्याआडही केलेल्या असतात. चौधरीबाईंना मात्र ते जमलं नाही. या परिस्थितीत त्यांच्या समोर दुहेरी आव्हान होतं : एक, विद्यार्थीसंख्या वाढवणं; आणि दुसरं, इमारतीसह भौतिक सुविधांसह शाळा उभारणं. शाळेची गुणवत्ता वाढली की विद्यार्थीसंख्या वाढणार, हे कळायला बाईंना काही नवा सिद्धांत कोळून प्यायचा नव्हता. जात्याच एक प्रेमळ शिक्षक असल्याने नवनवीन अध्यापन पद्धती वापरून, नवनव्या शैक्षणिक साधनांचा वापर करून, मुलांच्या अडचणींचा अन् पालकांच्या अपेक्षांचा विचार करून, इयत्ता पाचवीपर्यंतची ही शाळा, २०१६च्या बत्तीस पटसंख्येवरून २०२०पर्यंत बावन्नवर आणून ठेवली. त्यासाठी त्या आपल्या सहकारी शिक्षकांसोबत बांधिवलीशेजारी नव्याने वसलेल्या केबीकेनगर या वसाहतीत दारोदारी फिरल्या. एका वर्षातच त्यांना विद्यार्थीसंख्येत सकारात्मक फरक दिसून आला आणि त्यांची उमेद वाढत गेली. या उमेदीने त्यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी गावकऱ्यांची एक सभा घेतली आणि लागलीच शाळा सुधार समिती स्थापन केली. त्यात त्यांनी गावकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. गावकऱ्यांनीही या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद दिला. पाण्याची टाकी, स्वच्छ पाण्यासाठी ॲक्वागार्ड, खेळाचे साहित्य, वाचनालयासाठी पुस्तके, संगणक, लॅपटॉप, पंखे अशी साधने आणि सुविधा शाळेत आल्या.
पण, अजून एक मोठ्ठा प्रश्न कायम होता, तो म्हणजे शाळेच्या इमारतीचं काय? ‘शिक्षक म्हणून आपल्याला शक्य तेवढं आपण केलं’, असं म्हणून एखादा शिक्षक गप्प बसला असता. मात्र, अंतिम ध्येयाचा घ्यास घेतलेल्या चौधरीबाई एवढ्यावर थांबल्या नाहीत. त्यांनी शासनाकडे इमारतीच्या बांधकामासाठी अर्ज केला; पण, सरकारी पातळीवर या अर्जाचं काही होणार नाही, हे जाणून असलेल्या बाईंनी दुसरीकडे वैयक्तिक प्रयत्नही सुरूच ठेवले.
कल्याणला राहणाऱ्या रंजनाबाईंना रोज कल्याण ते शेलू असा लोकल प्रवास करावा लागतो. या प्रवासातील त्यांची मैत्रीण डॉ. सुजाता कुलकर्णी यांच्याजवळ त्यांनी ही अडचण बोलून दाखविली आणि त्यांच्या मदतीने अनेक सेवाभावी संस्थांना शाळेच्या इमारती निधीसाठी आवाहन केले गेले. होता होता चमत्कार घडावा तसा, एक दिवस मुंबई येथील ‘एम्पथी फाऊंडेशन’कडून शाळेला फोन आला. त्यांनी शाळेच्या बांधकामाच्या खर्चापैकी चक्क ८० टक्के रक्कम खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली. अर्थात, त्यासाठी एम्पथी फाऊंडेशनकडून शाळेची गुणवत्ता, विद्यार्थीसंख्या तपासली जाणार होती. दूरदर्शी रंजनाबाईंनी या कसोटीची आधीच तयारी केली असल्याने त्या आणि त्यांची शाळा यात अगदी सहज उत्तीर्ण झाल्या. खरा प्रश्न होता २० टक्के रक्कम गोळा करण्याचा! त्यासाठी मे महिन्याच्या सुट्टीतही पायाला भिंगरी लावून रंजनाबाई आणि सहकारी शिक्षक लोकवर्गणीसाठी फिरले. अन् ३१ मे २०१९ रोजी शाळेच्या बांधकामाचा श्रीगणेशा झाला.

पाहता पाहता इमारत उभी राहिली. नुसती उभी राहिली नाही, तर संगीत कक्ष, संगणक कक्ष, अभ्यासघटकांनी रंगवलेल्या सुबक भिंती यांनी या इमारतीला अद्ययावत देखणं रूप प्राप्त झालं. याच इमारतीचं यंदाच्या शिवजंयतीनिमित्ताने अभिनेत्री आणि मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत, एम्पथी फाऊंडेशनचे मुख्य कार्य अधिकारी सुंदरेश्वर, रोटरी क्लबचे विरेन गोहील यांच्या हस्ते लोकार्पण झालं. गावचा सोहळा असल्याने बांधिवलीचे गावकरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित असणं स्वाभाविकच होतं. मात्र सांगायला खेद वाटतो की, इमारत बांधण्यासाठी एकदिलाने साहाय्य करणाऱ्या एकाही गावकऱ्याचं मूल या शाळेत शिकत नाही. रंजनाबाईंना जे अंतिम ध्येय गाठायचं आहे, ते हेच, गावातली मुलं गावातल्या शाळेत शिकण्याचं! त्याशिवाय त्यांच्या मनातलं नंदनवन साकार होणार नाही. आता हे पाहायचंय की, आर्थिक साहाय्य उभारण्यात पुढाकार घेणारे गावकरीरूपी मावळे येत्या शिवजयंतीपर्यंत आपल्या मुलांना गावातल्याच शाळेत घालून, ह्या चौधरीरूपी शिवाजीला (खरं तर जिजाऊंना) साथ देतील अशी आशा आहे! तेव्हाच, शिवजंयती, शिवराज्याभिषेक यांसारखे सोहळे दणक्यात साजऱ्या करणाऱ्या महाराष्ट्रातून - शिवाजी जन्माला येवो, पण तो दुसऱ्याच्या घरात - ही म्हण पुसली जाईल!
आजच्या दिवशी मराठी भाषा दिनानिमित्त केवढी तरी विविधांगी मराठीची आळवणी होईल, मात्र आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेत घालणार नसू, अन् तरी दरवर्षी वाढत्या जोशात हा दिन साजरा करणार असू, तर आपण खरंच शिवाजी महाराजांचा वारसा सांगण्यास लायक आहोत का? हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने इतरांना नव्हे, तर स्वतःलाच विचारला पाहिजे. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील गड जिंकून मुळावर घाव घालण्याची रणनीती य़शस्वी केली. इतका उज्जवल आयता वारसा असताना, मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी मराठी शाळा जगवण्याचा मूळ उपाय सोडून; वरवची मलमपट्टी करण्याचा उद्योग आपण का करतो आहोत...?

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

मातृभाषेतील शिक्षण , मराठी शाळा , उपक्रमशील शाळा , जिल्हा परिषद शाळा , शिवजंयती , शिवराज्याभिषेक , मराठी भाषा दिन , चिन्मयी सुमीत , रंजना चौधरी , साधना गोरे , मराठी अभ्य़ास केंद्र

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen