एका समृद्ध वारश्याची अखेर !

संपादकीय    संपादकीय    2020-09-03 12:00:41   

कोरोनाच्या पाशाने जगाला वेढले असतानाच, माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न श्री. प्रणब मुखर्जी यांचे परवा निधन झाले.  त्यांच्या वयाचा विचार करता ही घटना अनपेक्षित नसली, तरी विचारी भारतीय मनाला चटका  लावून जाणारी होती.

डिग्निटी, ग्रेस आणि इंटीग्रिटी या गुणांना मराठी प्रतिशब्द नक्की आहेत. मात्र या तीन इंग्लिश शब्दांतून जितक्या नेमकेपणाने प्रणब मुखर्जी यांचे दर्शन होते, तसे ते मराठी शब्दांतून होणार नाही असे वाटते. प्रणबदांचा तो ऐटबाज सिगार, फर्डे इंग्रजी, बोलताना जाणवणारी विलक्षण बुद्धिमत्ता, वागण्यातला रुबाब आणि अदब या सर्वांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक खानदानी ओल्ड ब्रिटीश झाक होती. कदाचित त्यामुळेच की काय, प्रणबदांचे वर्णन करताना आम्हाला हे इंग्रजी शब्द वापरण्याचा मोह झाला असावा. आता मायमराठीत सांगायचे तर ऋजुता आणि कणखरपणा हे दोन परस्परविरोधी भासणारे स्वभावविशेष एकाचवेळी वागवणारे व्यक्तिमत्व म्हणून देश प्रणबदांना ओळखतो. केंद्रीय गृहमंत्री असताना अतिशय कठोरपणे दहशतवादाच्या विरोधात उभे असलेले प्रणबदा ते राष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर पक्षनिरपेक्ष आणि सर्वसमावेशी भूमिका धारण केलेले प्रणबदा, हे त्यांचे परिवर्तन सुखद अर्थाने विस्मयकारक होतं. प्रणबदांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःची मर्यादा ओळखणे. राजीव गांधींशी दुरावा झाल्यावर १९८६ साली त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून बंगालमध्ये राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस हा स्वतःचा पक्ष चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन वर्षांनी पुन्हा राजीव गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते कॉंग्रेसमध्ये विलीन झाले. पंतप्रधान म्हणून भारताचं जर नेतृत्व करायचं असेल तर सर्वाधिक प्रचलित असलेल्या हिंदी भाषेत उत्तम संवाद साधता आला पाहिजे. मात्र आपल्यात ती त्रुटी आहे, ही जाणीव त्यांना याच काळात झाली असावी. जात्याच हुशार असलेल्या प्रणबदांनी ती खुणगाठ मनाशी पक्की बांधली. बहुदा म्हणूनच तीन वेळा पंतप्रधानपद हुलकावणी देऊन गेल्याची खंत त्यांच्या पुढील व्यवहारात कधीही दिसली नाही. इंदिरानिष्ठ म्हणून प्रसिद्धीस आलेले प्रणबदा, हे बहुदा इंदिराबाईंचे शेवटचे महत्वाचे राजकीय वारसदार. त्या अर्थाने त्यांचे निधन ही एका युगाची समाप्ती देखील म्हणता येईल. ज्या पश्चिम बंगालमध्ये त्यांची कारकीर्द सुरु झाली तिथे १९७२ सालापासून सातत्याने कम्युनिस्ट राजवट होती. सिद्धार्थ शंकर रे हा बंगालमधील कॉंग्रेसचा खरा चेहरा होता. आणि प्रणबदांचा पिंडही लोकनेत्याचा वगैरे नव्हता. त्यामुळे ते बंगाल सोडून दिल्लीत इंदिराबाईंचे दरबारी राजकारणी म्हणूनच रमले. मात्र तिथे केवळ खुर्चीच्या अवतीभवती न घुटमळता आपली हुशारी, ज्ञान, संवादकौशल्य यांचा पक्षासाठी पुरेपूर वापर करून, प्रणबदा कायम संकटमोचक म्हणून उभे राहिले. त्यांची हीच भूमिका पुढे मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही कायम होती. त्यामुळेच एकेकाळचा हा राजीव विरोधक, चक्क सोनिया गांधींचा निकटवर्ती आणि विश्वासू सल्लागार बनला. ज्याची फलश्रुती अखेरीस राष्ट्रपतीपदी विराजमान होण्यातही झाली. सर्वसाधारणपणे कुठल्याही क्षेत्रात माणसाचे स्थान बदलले की त्यानुसार आपले आचार-विचार बदलणे त्याला जमत नाही. त्यामुळे मग तो टीकेचा धनी ठरू शकतो. पण प्रणबदा याला अपवाद ठरले. सर्वार्थाने काँग्रेसी राजकारणी म्हणून आपला कार्यकाळ घालवल्यावर शेवटच्या टप्प्यात ते राष्ट्रपती झाले. त्यानंतर दोन वर्षांनी दिल्लीत राजवट बदलली. पण राष्ट्रपती झाल्यावर प्रणबदा मनोमन त्या भूमिकेत शिरले होते. त्यामुळे एक घटनादत्त राष्ट्रपती म्हणून कॉंग्रेस सरकार प्रमाणेच भाजप सरकारही माझेच आहे ही त्यांची धारणा होती. त्यामुळे एकदा त्या स्थानावर बसल्यावर नवीन सरकारच्या निर्णयांवर टीका करणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. त्यामुळे निर्माण होवू शकणाऱ्या घटनात्मक पेचाची जाणीव त्यांना होती. संसदीय परंपरांचा खोल ठसा त्यांच्यावर असण्याचे हे ठळक लक्षण म्हणावे लागेल. सध्या ताणल्या गेलेल्या राजकीय धृवीकरणाच्या वातावरणातही आपले संतुलन न गमावणे हे प्रणबदांचे खरे मोठेपण. अगदी राष्ट्रपतीपदावरून पायउतार झाल्यावरही सरकारवर टिप्पणी न करता त्या सरकारच्या निर्णयांना मी बांधील होतो, अशीच त्यांची भूमिका होती. दोन वर्षापूर्वी माजी राष्ट्रपती प्रणबदांना रा.स्व. संघाने आपल्या नागपूरच्या कार्यक्रमात बोलावले. आयुष्यभर ज्याच्या धोरण आणि कृतींवर प्रणबदांनी टीका केली, त्या संघाचे आमंत्रण त्यांनी स्वीकारले. त्यामुळे देशभर गदारोळ झाला. कॉंग्रेस पक्ष आणि अन्य विरोधकांकडून त्यांच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली. राजकीय अस्पृश्यतेला न मानणाऱ्या प्रणबदांनी त्याकडे दुर्लक्ष करून संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र आपल्या भाषणात यजमान संघाला त्याच्याच व्यासपीठावरून परखड बोल सुनावण्यासही ते कचरले नाही. असं म्हणतात की मोठ्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर माणूस कसा वागतो यावरून त्याचे खरे मूल्यमापन होते. या घटनेतून नेमके तेच दिसून आले. प्रणबदांच्या अखेरच्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते " भारतीयत्वाचे रक्षण करणे हे सर्वात महत्वाचे आहे. त्याच्याशी खेळ करता कामा नये. १३० कोटी लोक, त्यांच्या दैनंदिन व्यवहारात शंभराहून अधिक भाषा किंवा बोली वापरतात, सात धर्मांचे अनुयायी असतात, त्यातले मोठ्या प्रमाणावर लोक कॉकेशियन, द्रविड आणि मोगल या तीन चमूत विभागले गेलेले असतात, तरीही हे सगळे एक संविधान, एक सरकार आणि एका राष्ट्रध्वजाचे पालन करतात. हे भारतीयत्व आहे आणि हे जपले पाहिजे. ते तेव्हाच जपले जाईल जेव्हा आपण ही विविधता साजरी करू, अन्यांचा सन्मान करू, आणि कायम सहिष्णू राहू. " आता याहून भारतीयत्वाची चांगली व्याख्या काय असेल ? प्रणब मुखर्जी यांना बहुविध परिवार आणि आमच्या सर्व वाचकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

संपादकीय

प्रतिक्रिया

 1. sondara.sudam@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  प्रणवदा यांच्याबद्दल आदर वाढला .

 2. suhasnannajkar07@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  भावपूर्ण श्रद्धांजली

 3. sumamata@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  वास्तववादी

 4. advshrikalantri@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  छोटा पण छान .आणीबाणी नन्तर स्थापित झालेल्या शाह कमीशन समोर सिद्धार्थ शन्कर राय ने आपले हाथ झटकले. इन्दिराजी परत सत्तेत आल्या आणि सिद्धार्थ यान्चे दिवस सम्पले.

 5. hemant.a.marathe@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  अगदी योग्य, मुद्देसूद मुल्यमापन केले आहे आपण प्रणवदांचे

 6. rajandaga

    2 वर्षांपूर्वी

  नेमके विवेचन केले आहे Bjp आणि कांग्रेस दोन्हीं समान हे राष्ट्रपति झाल्यावर दाखवून दिले विनम्र आदरांजलि

 7. daherenkoji@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  राजकीय विचारसरणी पेक्षा देशहित श्रेष्ठ..आणि ती बांधिलकी जोपासताना पक्ष हिताला देखील बाधा येणार नाही याची दक्षता घेणारे प्रगल्भ बुद्धीवादी, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाचे काँग्रेस पक्षातील एका युगाचा अंत झाला आहे.! आपण संपादकीयातून त्यांना दिलेली ही अखेरची मानवंदना समयोचित म्हणावी लागेल.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen