इरफान आणि ऋषी - बदलांचे दूत

संपादकीय    संपादकीय    2020-05-02 18:30:05   

जगात जवळपास सर्वच देशांमध्ये चित्रपट तयार होतात, परंतु चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यातलं नातं जे आणि जसं भारतात आहे तसं इतरत्र कुठं क्वचितच असेल. ‘चित्रपट गीते’ नावाची जी एक आयुष्य व्यापून उरणारी जादू भारतात चित्रपटांनी जन्माला घातली ती तर जगात एकमेवाव्दितीयच आहे. भारतात चित्रपट ही एक भावनिक गरज आहे, ते केवळ मनोरंजन नाही. त्यामुळेच ‘भावनांना हात घालणे’ याला आपण खूप जास्त महत्व देतो. हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना, संपन्न-श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणारी मोठ्या संख्येने असलेली जनता हा चित्रपटांचा आधार होता. मध्यम वर्ग कनिष्ठ मध्यमवर्ग आणि त्या खालचा वर्ग हा मुख्यतः प्रेक्षक होता. आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेत गेल्या २५ वर्षात ही परिस्थिती बदलली. उच्च मध्यमवर्गीय वाढला, कनिष्ठांचा प्रवासही हलाखीच्या पुढच्या टप्प्यात आला. मुले परदेशी जाऊन आई-बापांना बरे दिवस दाखवू लागली. मॉल, मल्टिप्लेक्स आले, सॅशे कल्चरमुळे श्रीमंती शौक ‘दोन रूपयांत’ भागवून सुखाची चव चाखण्याची सोय झाली. जागतिक चित्रपट सहज पाहता येऊ लागले. श्रीमंती आपल्याही आवाक्यात येऊ शकते हे कळले. आपल्या ‘इमोशन्स’ची प्रकृती बदलली, हळवेपणा, भाबडेपणा कमी झाला, काव्यात रमण्याएवढी तरलता उरली नाही. व्यवहारी लोकांची संख्या वाढली. या बदलांचा चित्रपटांच्या प्रकृती-आशयावरही परिणाम झाला. या आठवड्यात अचानक इंतकाल झालेला इरफान खान हा या नव्या बदलत्या, बदललेल्या चित्रपटांचा प्रतिनिधी होता. तर ऋषी कपूर हा ‘भावनावेग’ न आवरणाऱ्या पिढीचा वारसा सांगणारा होता. कोणतेही बदल एकाच वेळी आणि सर्वच स्तरांवर होत नसतात. त्यामुळे या दोन्ही प्रकृतीचे चित्रपट आजही येत आहेत, परंतु इरफानच्या प्रकृतीचे चित्रपट हा आपला भविष्यकाळ आहे, ऋषीचे चित्रपट हा भूतकाळ आहे...संपत चाललेला. मात्र दोघेही एका अर्थाने कलात्मक बदलांचे दूत ठरले, हा एक योगायोग आहे. अभिनेता होण्यासाठी सौंदर्य, व्यक्तिमत्व वगैरे निकष लागण्याच्या काळात इरफानला ‘सलाम बॉम्बे’, एक डॉक्टर की मौत, सारखे चित्रपट करावे लागत. ‘दृष्टी’मध्ये गोविंद निहलानीने त्याला डिंपल कपाडियाशी ‘अफेअर’ करायला लावले. त्या चित्रपटात पस्तिशीतली डिंपल कोणत्याही विवाहित ‘पुरुषांचे स्वप्न’ म्हणावे एवढी मादक-आकर्षक दिसली होती. या चित्रपटात शेखर कपूर तिचा नवरा होता. शेखरचं व्यक्तिमत्व परफेक्ट नवश्रीमंताचं, अशा स्त्रीचा नवरा म्हणून शोभणारं होतं. तिथं इरफानसारख्या सामान्य व्यक्तिमत्वाच्या परंतु अभिनेता म्हणून मोठा वकुब असलेल्या कलावंताचा अचूक उपयोग दिग्दर्शकानं करुन घेतला. संपन्न घरातील असमाधानी स्त्री, पुरुषांत सौंदर्य पाहात नाही, तर स्त्रीला समजून घेण्यातली त्याची संवेदनशीलता तिला अधिक महत्वाची वाटते. आपलं म्हणणं सांगण्यासाठी निहलानीने इरफानचा शस्त्र म्हणून वापर करुन घेतला, त्या शस्त्राला इरफानमधील अस्सल अभिनेत्यानं धार आणली. अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा तेंव्हा ‘समांतर’, ‘कलात्मक’ म्हटल्या जाणाऱ्या चित्रपटांमधूनच असत. १९९५ नंतर हळू हळू झालेल्या बदलांत, मल्टिप्लेक्सचा नवा प्रेक्षक तयार होत असल्याच्या काळात ‘समांतर’चा प्रवाह मुख्य प्रवाहात हळू हळू मिसळू लागला. त्यामुळेच इरफानला मकबुल पासून पिकू-अंग्रेजी मिडियम पर्यतचा प्रवास करता आला. लोकप्रियतेचे वलय अनुभवता आले. आजवर रूढ असलेले पडद्यावरील सौंदर्याचे निकष आज केवळ चित्रपटच नव्हे तर मालिका, वेबसिरिज सगळेच मोडून टाकत आहेत. इरफान या सगळ्या बदलांमधला एक लाभार्थी घटक होता. इरफानला मिळालेलं ग्लॅमर, त्याच्या निधनानंतर सोशल मिडीयावर आलेला दुःखाचा पूर हे सर्व या बदलत्या काळाचं प्रतिबिंब आहे. खूप कमी वयात कॅन्सरने तो गेला, त्यातून आलेली सहानुभूतीची लाट त्या पुराला अधिक गती देऊन गेली एवढंच. ऋषी कपूर मात्र आपल्या नायकपदाच्या सर्व अपेक्षा आणि परीक्षा पूर्ण मार्कांनी पास झालेला कलावंत होता. काळाच्या संदर्भात पाहिले तर बॉबी ही राज कपूरने पडद्यावर केलेली छोटीशी क्रांतीच होती. परंतु वितभर पँटमध्ये वावरणारी, मोकळ्या ढाकळ्या स्वभावाची तरूणी म्हणून राज कपूरला ती ‘ख्रिश्चन’ दाखवावी लागली होती. इतपत मोकळेपणा केवळ ख्रिश्चन तरूणीमध्येच असू शकतो या आपल्या घट्ट समजाचे ते फळ होते. त्यानंतरच्या चाळीस वर्षात हा ‘ख्रिश्चन मोकळेपणा’ घरोघरी दिसू लागला असून, त्यालाच आता ‘मॉडर्न’ समजले जाते. परतुं ऋषी कपूरची कारकीर्द एवढी प्रदीर्घ असूनही आपल्याला नायक म्हणून त्याच्या भूमिका फार आठवत नाहीत. आपल्याला आठवतात ती त्याची गाणी, त्याचे रंगीत कपडे, प्रत्येक गाण्यासोबत आठवतो तेव्हाचा काळ. ‘बॉबी’मधील ‘और चाबी खो जाय’ पासून तर ‘मैं शायर तो नही’ पर्यंत सर्वच गाणी लोकप्रिय ठरली होती. चित्रपटाची लांबी थोडी जास्त होते, अशी तक्रार काही चित्रपट वितरकांनी केली तेंव्हा एका गाणे कापायचे ठरले. त्यात बळी गेला, बॉबीमधील सर्वात सुंदर गाण्याचा- ‘अखियोंको रहने दे, अखियोंके आसपास’ हे गाणे राज कपूरने काढून टाकले. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाने राज कपूरचे डोळे उघडले होते. काव्य, गहिरा अर्थ, संवेदनशीलता, नजाकत या शब्दांचे दिवस संपत आल्याची व्यावहारिक जाणीव त्याला झाली होती. ऋषी कपूरची सुरुवातच ‘टाइम्स आर चेंजिंग’ च्या जाणीवेने झाली. प्रेमाला सामाजिक विचार, कर्तव्य, मूल्ये, तत्वे, त्याग, कौटुंबिक मूल्ये यांची जोड देण्याचा काळ संपून, संपूर्ण मनोरंजन, 'दुनियाकी कोई दिवार हमे रोक नही सकती' अश्या बंडखोरीचा काळ सुरु झाला तो बॉबीपासूनच. सोपी गाणी, सोपे संगीत, सोप्या समस्या, सोपी उत्तरे...त्याला पुढे थोडा छेद दिला तो अमिताभच्या काही चित्रपटांनी, पण तोही ढोबळपणेच. त्यातही ऋषी कपूरने सहनायक म्हणून त्याला साथ केली. चित्रपटांनी मनोरंजनाचा हा सोपा मार्ग धरल्यानेच समांतर चित्रपट जन्माला आला, पुढे त्याचाही अतिरेक होऊन फॉर्म्युला तयार झाला, तो पुढचा इतिहास. ऋषी कपूर प्रामुख्याने ओळखला गेला तो संगीतमय प्रणयपटांचा नायक म्हणून. त्याच्यासोबत चित्रपटांत पदार्पण करणाऱ्या नायिकांची संख्या २५ हून अधिक होती. परंतु तरीही त्याची खरी जोडी जमली ती नितू सिंग सोबतच. त्याने नितूसोबत तब्बल १२ चित्रपट केले, जे सर्व लोकप्रिय झाले होते. परंतु त्यांच्या कथा कुणाला आठवतात? व्यक्तिरेखा आठवतात? नाही! ‘नायक-नायिकेच्या प्रेमात संकटे आली, नायकाने ती दूर केली, अखेर दोघांचे मिलन झाले.’ हीच कथा, जवळपास सर्व चित्रपटांची. त्यामुळेच आपले नायकत्व झुगारून ऋषीने ‘दुसरा आदमी’ केला , तो लक्षात राहतो. ‘हथियार’ केला, तो आठवतो. ‘सागर’ तर ठसठशीतपणे उभा राहतो. अभिनेता म्हणून त्याची कुवत नव्हती असे नव्हे. परंतु कलावंत हा त्या त्या काळाचे प्रॉडक्ट असतो. नौशाद, शंकर जयकिशन, ओपी, एसडी, मदन मोहन आणि साहिर, हसरत, शैलेंद्र, मजरुह हे त्या काळात झाले, ते आता होऊच शकणार नाहीत. रणबीर कपूरच्या आठ-दहा वर्षाच्या कारकीर्दीत त्याला ऋषी कपूरपेक्षा अधिक वैविध्य पडद्यावर दाखवता आले तेही या बदलांमुळेच. तर, समाज आणि कला यांचा प्रवास समांतर असतो हे आपल्याला असे इतिहासात डोळसपणे डोकावताना लक्षात येते. अर्थात हा डोळसपणा येतो चोखंदळ, उत्तम वाचनातून निरीक्षणातून. बहुविधच्या सर्वच व्यासपीठांवरचे लेख हे वाचकांना अशा जाणत्या डोळसपणाकडे घेऊन जाण्याचाच आमचा एक प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटते?

संपादकीय

प्रतिक्रिया

 1. mukunddeshpande6958@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  वाह, फारच छान

 2. cma171068

    3 वर्षांपूर्वी

  अप्रतिम लेख आणि शैली.....विरोधाभास दाखवताना राखलेला आदर आणि संयम वाखाणण्याजोगा. मला लेख आवडला

 3. ramdasjagtapindus919@gmail.com

    3 वर्षांपूर्वी

  लेख अती सुंदर, उल्लेख केल्या प्रमाणे इरफान सर फार दुर्दवी ठरले, कलात्मक गुण बहरत असताना नीतीने घात केला, यामुळे एक गोष्ट समोर आली की आजार सुद्धा किती जीवन घेणे आहे आणि म्हणून या आजार पनातील दुर्घटना टाळण्यासाठी तज्ञ् व्यक्तीनी पुढे यावे. व आपल्या विचाराने प्रभोधन करावे, जेणेकरून असे इरफान आपल्यातील वाचता येऊ शकतात का? काही उपाय असेल का? असेल तर स्वरूप जर कळाले तर येणाऱ्या पिढीला मदत ठरेलं असे मला वाटते.

 4. abhimandhawas3@gmail.com

    3 वर्षांपूर्वी

  अभ्यास पूर्ण आणि वाचनीय माहिती दिली आहे?

 5. shubhadabodas

    3 वर्षांपूर्वी

  हिंदी सिनेमाबाबत फारसीत माहिती नाही तरीही दोनवेगळ्या कालखंडांचा तुलनात्मक विचार अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहे.

 6. Shirish1968

    3 वर्षांपूर्वी

  भयकंंर रोगावर आज ही इलाज नाही, असो. परन्तू हे दोघ ही दिग्गज कलाकारानांं शत शत नमन....

 7. Shirish1968

    3 वर्षांपूर्वी

  इरफान खान आणि ऋषींकपूर हे दोघ पडद्यावरचे नामवंंत कलाकार काळाच्या पडद्या आड गेले. परन्तु सर्वाना एक धक्का देऊन गेले आणि आज ही हया २१ व्या शतकात किंंवा विज्ञान च्या युगात कैन्सर सारख्या भयकर

 8. VinitaYG

    3 वर्षांपूर्वी

  Perfect analysis

 9. anuradha_dixit

    3 वर्षांपूर्वी

  इरफान आणि ऋषी कपूरच्या काळातील फरक स्पष्ट करणारा चांगला लेख

 10. rsrajurkar

    3 वर्षांपूर्वी

  अगदी बरोबर ! बहुविध च्या व्यासपीठावरील लेख वाचून विविध विषयांची समग्र माहिती तसेच त्या कडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन प्राप्त होतो.

 11. atmaram-jagdale

    3 वर्षांपूर्वी

  लेख सुंदर आहे . ताजा टवटवीत व वर्तमान विषयावर आहे .वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen