पिक्चर अभी बाकी है...

संपादकीय    संपादकीय    2020-04-20 19:00:27   

एक टाळेबंदी संपली. आता दुसरी सुरु झाली आहे. नवशिक्यांना गड-किल्ले चढवून नेताना एक तंत्र वापरले जाते. साधारण त्या नवशिक्याचा धीर सुटायला लागला की जो म्होरक्या असतो तो 'झालं...आलंच, आणखी थोडंच राहिलंय' असं म्हणतो. असं म्हणत म्हणत अशक्य वाटेल असं अंतर आपण पार करून येतो तेव्हा आपल्या क्षमतेचं आपल्यालाच अप्रूप वाटायला लागतं. या उदाहरणातील नवशिके कोण आणि म्होरक्या कोण हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच.  ही  टाळेबंदी कधी उठणार याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. २१ दिवसांची झाला, आता चाळीस दिवसांची सुरु आहे. मध्ये कोणीतरी ४९ दिवसांची थियरी मांडली होती. कोणी वूहान च्या ६० दिवसांच्या टाळेबंदीचे उदाहरण समोर ठेवत आहेत. थोडक्यात काय? टाळेबंदी उठण्याच्या दोन दिवस आधी म्होरक्याच्या मनात काय आहे ते आपल्याला कळतं आणि मग आपणही आपलं मन घट्ट करतो. पण कितीही झालं तरी आपल्यापैकी १००% जण ही टाळेबंदी उठण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. कसं असेल  ही टाळेबंदी संपल्यानंतरचे जग? शेअर मार्केट मध्ये बुल्स आणि बेअर्स अशा दोन पार्ट्या असतात. दोघांचेही भविष्याबद्दलचे विचार एकमेकांपासून १८० अंशात वेगळे असतात. म्हणजे बेअर्स ना जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खालती जाणार असं वाटत असतं तेव्हाच बुल्स ना मात्र ती खरेदीची संधी वाटत असते. सध्या जगात पण या टाळेबंदीबद्दल अशी दोन टोकाची मत आहेत. खूप जणांची अशी कल्पना आहे की टाळेबंदी उठल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ( ४ मे म्हणायचं आपण मुद्दाम टाळतोय :-) ) सगळं सुरळीत पहिल्याप्रमाणे सुरु होईल. म्हणजे कोरोना कंटाळून कंटाळून त्याला भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने वैतागून आपल्या सर्वांच्या आयुष्यातून निघून गेलेला असेल. आणि मग आपण पुन्हा सगळीकडे भटकायला मोकळे. खूप छान कल्पना आहे ना? पण सगळ्यांनाच असं वाटतंय असं नाही बरं. काही जण असेही आहेत ज्यांना वाटतंय ही जगाच्या अंताची सुरुवात आहे. मानवाने निसर्गाविरुद्ध सुरु केलेलं हे युद्ध आता अंतिम टप्प्यात वगैरे आलंय आणि निसर्गाचा मानवावर विजय ही आता केवळ औपचरिकता बाकी आहे. म्हणजे थोडक्यात काय तर 'सगळं संपलंय आणि आपल्या सगळ्यांचं भविष्य अंधारमय आहे'. रोज बातम्या आहेत की सरकार जास्तीत जास्त रुग्ण admit करू शकतील एवढी हॉस्पिटल्स, आयसीयु चे बेड्स वाढवते आहे. बाहेरून कंटेनर भरभरून PPE ( private protection equipment ), कोरोना तपासणी किट्स आपण मागवतोय. याचा अर्थ टाळेबंदी कालावधीत सरकार 'तयारी' तर करत नाहीये ना?.... विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण समजा, अगदी टोकांच विचार केला, सगळ्या जगाला जरी कोरोना झाला आणि त्यात मनुष्यहानी झाली तर ती किती होईल? अगदी १०% जरी धरली तरीही उरलेल्या 90% लोकांसाठी जग सुरु राहणार आहेच ना? positive विचार करणाऱ्यांसाठी हा ही मुद्दा एकदम बरोबर वाटतो. सामान्य माणसांना तर दोन्ही बाजू पटतात. त्यांचा गोंधळ वाढवण्यासाठी जगात येऊ घातलेली महामंदी, चीन-अमेरिका संघर्ष, तेलसंकट ( तेलाचे दर कमी होऊनही याला तेलसंकट का म्हणावे? ) वगैरे अनेक मुद्दे समोर आणले जात आहेत. काय होणार आहे नक्की? हं...जाऊ दे. एवढा जगाबिगाचा विचार करायला आपल्याला फुरसत नाही आणि मुख्य म्हणजे जमतही नाही. आपण आपला आपल्यापुरता विचार करूया. आपल्यासाठी सध्या सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे? सगळा मिळून जो काही टाळेबंदी चा कालावधी आहे तो संपला की आपण लगेच आपल्या दिनक्रमाला सुरुवात करू शकू? कोरोनोत्तर हे जग कसे असेल यावर तज्ञ काय म्हणतात ते जाऊ द्या. आपणच आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या सवयींमध्ये बदल करणार आहोत का? काय असतील हे बदल? आम्ही बहुविध डॉट कॉम तर्फे याच विषयावर एक सर्वेक्षण केले. कल्पना अशी होती की या आणि अशा प्रश्नांवर वैयक्तिक उत्तरं घ्यायची आणि मग सगळ्यांची उत्तरं एकत्र करून एक निष्कर्ष काढायचा. कल्पना लोकांना आवडली. मग आम्ही एक प्रश्नपत्रिका तयार केली. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अशा चार गोष्टी निवडल्या ज्याच्यावर या कोरोनोत्तर काळात सगळ्यात मोठा प्रभाव आपल्याला अपेक्षित आहे. १. दैनंदिन सार्वजनिक वावर उदा. दैनंदिन प्रवास, shopping mall, सिनेमा hall, morning walk, gym वगैरे २. दैनंदिन काम ( जीविका ) म्हणजे अर्थार्जनाचे काम ३. आर्थिक गुंतवणूक: प्रमाण आणि पर्याय ४. बाहेरचे खाणे, खरेदी, बाहेरगावी फिरायला जाणे या त्या चार गोष्टी. कोरोना च्या आधी आपण जसे या गोष्टींकडे बघत होतो, विचार करत होतो आता कोरोनोत्तर काळात या चार गोष्टींकडे बघण्याचा आपला कोन बदलेल, की... कल्पना तर नक्की झाली, सर्वेक्षण कशाचे घ्यायचे हे ही नक्की झाले. आता हे सर्वेक्षण कसे घ्यायचे ते ठरवायचे होते. व्हॉट्सअॅपच्या ग्रुप्स वर आपण आपले एक आवाहन आणि हे सर्वेक्षण पाठवायचे असे ठरले. त्यानुसार आपापल्या मित्र, नातेवाईकांच्या ग्रुप्स वर, आपल्या पुनश्च वाचकांच्या ब्रॉडकास्ट लिस्टमधून याला सुरुवात केली. पण यात एक गोम होती. आपण हे प्रश्न विचारून त्यावर लिहून उत्तरं मागितली होती. पण यात सध्या ज्याबद्दल बोललं जातंय तो अनुभव प्रत्यक्षात आला. हल्ली असं म्हटलं जातं की लोकांना विचार करायला लावू नका आणि लिहायला तर अजिबात लावू नका. फॉरवर्ड काही करायचं असेल तर द्या. ते तत्परतेने होईल. त्यामुळे बऱ्याच जणांनी या प्रश्नावलीकडे दुर्लक्ष केलं. अर्थात सगळे असे नव्हते. २५% लोकांनी अगदी मनापासून यात भाग घेतला. त्यामुळे सुरुवातीच्या या सविस्तर उत्तरांनी आमचा उत्साह वाढला. एक सूचना अशीही आली की लोकांना लिहायला न लावता पर्याय दिले आणि त्यातून योग्य पर्याय निवडायला सांगितला तर अधिक प्रतिसाद येईल. शिवाय अशा प्रतिसादाचे पृथक्करण करणे पण सोप्पे. मग आम्ही एक गुगल फॉर्म बनवला, ज्यात उत्तरासाठी पर्याय दिले होते त्यातून योग्य तो पर्याय निवडायचा होता. तो सगळ्यांना पाठवला. मग असाच एक फॉर्म इंग्रजीत बनवला. एक वेगळा वर्ग त्यातून व्यक्त झाला. फेसबुक वर पण एक पोस्ट बनवली. अशी मग भरपूर उत्तरं मिळाली. अनेकांनी या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्यांचे वय, लिंग आणि सामाजिक स्तर याचाही विचार व्हावा अशी सूचना केली. अर्थात एवढं सगळं करायचं तर तो मोठा व्याप होतो. आपण आपलं सहज म्हणून सुरुवात केलेला हा उपक्रम होता. एखाद्याने यात रस घेऊन अधिक व्यापकतेने, शास्त्रोक्त पद्धतीने हे सर्वेक्षण केले तर अधिक चांगले निष्कर्ष आपल्या हाती येऊ शकतील. आपल्या या उपक्रमामुळे कोणाला अशी प्रेरणा मिळाली तर एकापरीने या उपक्रमाचं ते यश असेल. असो... आजवर दोनशे हून अधिक जणांनी या सर्वेक्षणात भाग घेतला आहे. हजारेक जणांचा data जमा झाला की निष्कर्ष काढणे अधिक सोपे जाईल. आपण अजूनही यात भाग घेतला नसेल नक्की घ्या. आपल्या मित्र-नातेवाईकांना पण ही प्रश्नावली पाठवा. आमच्या मते कोरोनाविरुद्धची ही लढाई टाळेबंदी काळात संपणार नाहीये. या काळात तर या लढाईची तयारी झाली आहे. आणि टाळेबंदी उठल्यावर करोडो लोक जेव्हा रस्त्यावर उतरतील, आपापल्या कामांना लागतील तेव्हा खरी लढाई सुरु होणार आहे. पिक्चर तो अभी बहोत बाकी है... *** या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही वरील चार प्रश्नांचा फॉर्म भरू शकाल. https://bit.ly/3bpH3QK

संपादकीय

प्रतिक्रिया

 1. Pramodsm

    2 वर्षांपूर्वी

  फॉर्म भरला पण २/३ ऑपशन असणे अपेक्षीत आहे पुर्वीपेक्षा कमी कारण एकदम बंद वगैरे लिहायला ठीक आहे पण असे होणे खूपच कठीण लेख उत्तम

 2. dhananjay

    2 वर्षांपूर्वी

  अतिशय सुंदर लेख आहे.

 3. pmadhav

    3 वर्षांपूर्वी

  चार स्तरावर पर्याय हवा... १. अगोदर प्रमाणे... २. कमी प्रमाणात... ३. पुर्ण बंद... ४. सांगता येत नाही... (पर्याय न निवडता येणं) ही सुद्धा एक प्रतिक्रीया आहे...

 4. aniloak18@gmail.com

    3 वर्षांपूर्वी

  प्रश्नावली अपूर्ण , त्रोटक

 5. raginipant

    3 वर्षांपूर्वी

  पूर्वी सारखेच चालू राहील किंवा पूर्ण बंद यात अजून एक option हवा कधीतरी

 6. lahamged@gmail.com

    3 वर्षांपूर्वी

  चांगला लेख सर्वे चा फायदा होईल

 7. shivaji65

    3 वर्षांपूर्वी

  चांगला लेख आहे, अगदी मनातले लिहिलेत.

 8. Sanjaypalkar

    3 वर्षांपूर्वी

  सुरेख आहे प्राप्त परिस्तिथीत अंतर्मुख करणारा आहे..

 9. netajimeshram998@gmail.com

    3 वर्षांपूर्वी

  छान आहे. सध्याच्या प्रश्नावर आहे. Good

 10. किरण भिडे

    3 वर्षांपूर्वी

  इतरांनाही पाठवा. आपण एक इंग्रजीत पण फॉर्म तयार केला आहे. लागला तर कळवा.

 11. atmaram-jagdale

    3 वर्षांपूर्वी

  चांगला सवै होईल . भरला फॉर्म .वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen