सत्तांतर, न झालेले

संपादकीय    संपादकीय    2020-02-15 15:03:08   

व्यंकटेश माडगूळकरांची 'सत्तांतर' ही एक अप्रतिम कादंबरी आहे. वास्तविक कादंबरीत एकही संवाद नाही, फक्त गोष्ट आहे. याचे कारण ही गोष्ट माणसांची नसून वानरांची आहे. वानरांच्या टोळ्या, त्यांचे झाडांवरील जीवन, टोळीचे नायकत्व, त्यासाठी होणारा सत्तासंघर्ष, त्यांची लैंगिकता, मादीसाठी होणारी झुंज, या सर्वांभोवती फिरणारे अतिशय रोचक कथासूत्र, वाचकाला खिळवून ठेवतं. डार्विनच्या सिद्धांतानुसार मानव हा पूर्वी वानरच असल्याने, त्याचे वर्तनही साधारणतः वरीलप्रमाणे चालू असते. पैकी सत्तासंघर्ष उघडपणे खेळला जातो, याची प्रचिती तर पदोपदी आपण घेत असतो. मात्र उत्क्रांतीनंतर मानवाने जसे त्याचे देहधर्म बंदिस्त जागेत उरकणे सुरु केले, त्याचप्रमाणे त्याची लैंगिकताही त्याने चार भिंतींच्या आड लपवली. आता तो अन्य प्राण्यांप्रमाणे तो उघड्यावर समागम करत नाही. तसेच त्याचा मेंदू प्रगत असल्याने कालौघात त्याने स्त्री-पुरुषांच्या जोड्या करणारी विवाहसंस्था निर्माण केली. स्त्रीच्या मनाविरुद्ध संभोग न लादणारी कायदेशीर  व्यवस्था निर्माण करण्याचाही त्याने बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला. पण या व्यवस्थेचे किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक घटना आजूबाजूला घडताना आपण पाहतो. आणि बलात्कार ही विकृती असल्याने जगभर त्यासाठी गुन्हेगारांना कडक किंवा अतिकडक शासन केले जाणे हेही आपण अनुभवत असतो. बलात्काराच्या कृतीचे वर्णन पाशवी असे केले जाते. पाशवी या शब्दाचा अर्थ पशुप्रमाणे. हा शब्दच दर्शवतो, की माणसाने वरील पूर्वसुरींचे गुणधर्म काही प्रमाणात तसेच जागृत ठेवले आहेत. पण अन्य कुठल्याही प्राण्यांत नसलेला एक नवा गुणधर्म अलीकडच्या काळात मानवाने, खरंतर 'पुरुषाने' असं म्हणूया, विकसित केलाय. आपल्याला नकार देणाऱ्या स्त्रीचे अस्तित्वच संपवणे, ही ती भयाण विकृती.  ८० च्या दशकात मुंबईजवळील उल्हासनगर येथे ' रिंकू पाटील' पासून सुरु झालेली ही भयमालिका परवाच्या हिंगणघाटपर्यंत सातत्याने चालूच राहिलेली दिसते. ' तू अगर मेरी नही बनी, तो किसी और की भी नही हो सकती ' चे हे संस्कार तरुणांवर कुठून होतात ? हिंदी चित्रपटांनी ते  घडवले आहेत, असे म्हणून या समस्येचे सुलभीकरण करता येणार नाही. लैंगिक भूक भागवण्याचे अन्य मार्ग असतानाही, ते सोडून माणूस जेव्हा बलात्कार करतो तेव्हा त्यामागे, कामतृप्तीपेक्षाही क्षणिक अधिकार गाजवण्याची पुरुषी विकृती कारणीभूत असते, असं मानसशास्त्र म्हणतं. याच विकृतीचे पुढचे पाउल म्हणजे जिच्यावर प्रेम(?) आहे अशा स्त्रीला अॅसिड फेकून विद्रूप करणे किंवा मारूनच टाकणे. गेल्या ३० वर्षात जागतिकीकरणामुळे, नोकरी- व्यवसायासह जीवनातील सर्वच क्षेत्रात शर्यत सुरु झाली आहे. शर्यत म्हंटली की हार किंवा जीत आली. शर्यतीत हरणे कुणालाच आवडत नसले तरी, सर्वसामान्यतः माणूस ते अपरिहार्य समजून स्वीकारतो. मात्र ही हार सहन न होणारे तुरळक जीव, एकतर कुठल्याही मार्गाने शर्यत जिंकतात, किंवा ते न जमल्यास घायकुतीला येऊन ती शर्यतच संपवण्याचा प्रयत्न करतात. नाकारणाऱ्या स्त्रीला मारून टाकणे हा शर्यत संपवण्याचा प्रकार म्हणावा का ? मानसोपचारतज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ या नव्या विकृतीची आपापल्या पद्धतीने संगती लावतीलच. पण त्याचे ठोस निदान झाल्याखेरीज या टोकाच्या मानवी भावनांचा निचरा होणे अशक्य. तोवर एक समाज म्हणून, अशा पिडीत स्त्रियांचे आक्रोश असहायपणे पहात राहणे हेच आपले दुर्दैवी भाग्यध्येय असेल का ? हा प्रश्न परवा व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर राहून राहून छळत होता. ***** व्हॅलेंटाईन डेचं खूळ आपल्याकडे सुरु होवूनही जवळपास तीन दशके होत आली. सुरुवातीला त्याबद्दल कुतूहल, नंतर विरोध, त्यानंतर हिंसक विरोध, आणि शेवटी जवळपास स्वीकार, अशा अवस्थांमधून गेलेला व्हॅलेंटाईन डे आता बऱ्यापैकी स्थिरावला आहे.  वास्तविक व्हॅलेंटाईन डे ज्याप्रमाणे लोकांना खूळ वाटते, त्याचप्रमाणे दिवाळी, दसरा, गणपती हेही अनेकांना खूळच वाटते. फरक इतकाच म्हणता येईल की या सणांना दीर्घ परंपरा आहे आणि व्हॅलेंटाईन डे हा तरुणाईचा नवा उत्सव आहे. आम्हाला खात्री आहे की ज्यावेळी सर्वप्रथम दिवाळी किंवा सार्वजनिक गणपती सुरु झाले असतील, तेव्हा काही तत्कालीन समाजवर्गांनी त्याची गणना ' नवे खूळ' म्हणूनच केली असेल. मात्र तरीही ते सण रुजले..वाढले, कारण अधिकाधिक लोकांनी ते उचलून धरले. व्हॅलेंटाईन डे हा पाश्च्यात्त्यांचा मार्केटिंग इव्हेंट आहे असा आक्षेप घेतला जातो, जे १०० टक्के सत्य आहे. पण त्यात आक्षेपार्ह ते काय ? आता आपल्याकडे गणेशोत्सव ते आयपीएल, हे सगळे मार्केटिंग इव्हेंट्सच झाले आहेत की. आणि 'व्हॅलेंटाईन डे पेक्षा वसंतोत्सव साजरा करा' असे म्हणणाऱ्या मंडळींना वसंतोत्सव लोकप्रिय करण्यापासून कोणी रोखले आहे ?  ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनला नावं ठेवण्याऐवजी, गुढीपाडव्याला नववर्षयात्रेचे भव्य आणि शिस्तबद्ध आयोजन करण्याचे उदाहरण डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानाने काही वर्षापूर्वी घालून दिले. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आज महाराष्ट्रातील जवळपास सर्व महत्वाच्या शहरांत आणि गावांत अशा यात्रा सुरु झाल्या आहेत. दुसऱ्याची रेषा पुसण्याऐवजी आपली रेषा मोठी करण्याचे हे अलीकडचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. सार्वजनिक उत्सवांचे फायदे-तोटे (तोटेच अधिक) हा विषय एक क्षण बाजूला ठेवू, पण उत्सवप्रियता ते जिवंत समाजाचे लक्षण आहे, आणि त्याला केलेला विरोध वांझ ठरतो हे समजून घेणं यानिमित्ताने आवश्यक ठरतं. ***** याच जिवंत समाजाचं लक्षण गेल्या आठवड्यातील दिल्ली विधानसभेच्या निकालांनी सुद्धा दाखवून दिलंय. जेमतेम ९ महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला साफ नाकारून, लोकांनी सर्वच्या सर्व सात जागांवर भाजपला निवडून दिलं होतं. परवा विधानसभेसाठी मतदान करताना मात्र ७० पैकी तब्बल ६२ जागांवर 'आप'ला दणदणीत विजयी करून त्याच जनतेने केजरीवालांना पुन्हा एकदा  सत्तेवर बसवले. दोन्ही वेळा सर्वसामान्य जनतेचे प्राधान्यक्रम दाखवून देणारे हे निकाल सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी मोदीच हवेत आणि विधानसभेसाठी केजरीवालच हवेत अशी सुस्पष्ट मांडणी डोक्यात असणाऱ्या दिल्लीकरांच्या निर्णयक्षमतेला दाद देणे इथे क्रमप्राप्त ठरते. बाकी कॉंग्रेस पक्षाला लोक इतके विटले आहेत की त्यांना प्रत्येकवेळी भोपळाच स्वीकारावा लागला. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी लोकांना सर्वशक्तिमान भाजपच्या विरोधात, कॉंग्रेस सोडून भक्कम पर्याय उपलब्ध होतो, तिथे त्या त्या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळतोय, हे ज्ञात असलेलं सत्य दिल्लीच्या निकालांनी पुनश्च अधोरेखीत केलं आहे, असं तूर्तास म्हणता येईल. **** [ पुन्हा पंधरा दिवसांनी संपादकीयमध्ये नवीन विषयांसह भेटूच. तोवर हा पाक्षिक संवाद, भला-बुरा कसा वाटतोय हे आम्हाला जरूर कळवा. आपला प्रतिसाद हीच आमची शिदोरी ]

संपादकीय

प्रतिक्रिया

 1. arush

    3 वर्षांपूर्वी

  खूप छान विश्लेषण

 2. manisha.kale

    3 वर्षांपूर्वी

  छान. विश्लेषण अगदी अचूक वाटतंय.

 3. Lavakeshchaware

    3 वर्षांपूर्वी

  लेख फार उत्तम आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen