पूर्णविराम... नव्हे, स्वल्पविराम !

संपादकीय    संपादकीय    2020-01-22 16:00:38   

आजच्या संपादकीयमध्ये पंकज कपूरचा फोटो कसा बुवा ? असा विचार करून एकदम दचकू नका. बहुविधवर पुनश्चखेरीज रूपवाणी ही खास सिनेरसिकांसाठीची कॅटेगरी सुद्धा आपण चालवतो. त्यामुळे सिनेमा हाही आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. असो. :) तर, पंकज कपूरचा 'एक डॉक्टर की मौत' आठवतोय का तुम्हाला ? १९९१-९२ च्या सुमारास आलेला तपन सिन्हा लिखित-दिग्दर्शित हा सिनेमा सुजाण रसिकांकडून नावाजला गेला होता. पंकज कपूरसह शबाना आझमी, इरफान खान अशी उत्तम स्टारकास्ट, आणि एक चांगले कथानक असल्याने लक्षात राहून गेला. कथेचा नायक असलेला डॉक्टर, दहा वर्षे सर्व काही विसरून आणि अविश्रांत मेहनत घेऊन कुष्ठरोगावर एक लस (व्हॅक्सीन) तयार करतो. पण त्याचेच वरिष्ठ ते संशोधन नाकारून त्याची बदली एका दूरस्थ खेडेगावी करतात. घटनाक्रम इतका प्रतिकूल असतो की, डॉक्टरला कमालीचं नैराश्य येऊन तो कबुलीजबाब देतो की,' मी कुठलीही लस बनवलेली नाही ' वगैरे वगैरे.... अर्थात सिनेमाचा शेवट सकारात्मक टप्प्यावर झालेला दाखवलाय. आज इतक्या वर्षांनी अचानक हा सिनेमा आठवण्यासाठी एक घटना कारणीभूत झाली. पुण्याहून प्रसिद्ध होणारे 'अक्षरमैफल' नावाचे एक आगळे मासिक गेल्या महिन्यात बंद झाले. मुकुल रणभोर या आमच्या पंचविशीतल्या तरुण मित्राने गेली दोन वर्षे अतिशय नेटाने हे दर्जेदार मासिक चालवले. अक्षर मैफल मध्ये खूप वेगवेगळ्या विषयांचा धांडोळा घेतला गेला. नव्या दमाचे उत्तम लेखक त्यातून लिहित असंत. सर्वसाधारणपणे ज्या विषयांना स्पर्श केला जात नाही असे, लैंगिकता, मुस्लीम समाजाचे प्रश्न, इत्यादी हटके विषय त्यातून मांडले गेले. रसिक वाचकांचा त्याला पाठिंबाही चांगला मिळाला. मात्र या प्रकारचे मुद्रित मासिक चालवणे हे आर्थिकदृष्ट्या नेहमीच आव्हान असते. पुनश्चसाठी आम्ही सातत्याने जुनी नियतकालिके आणि मासिकांच्या सहवासात असतो. त्यांची संपादकीये वाचताना लक्षात येतं, की अगदी १०० वर्षापूर्वी सुद्धा मासिकांच्या चालकांसाठी हा संघर्ष अटळ होता. मुळात दर्जेदार साहित्याचा वाचक कायमच संख्येने मुठभर असतो. बरं तो विविध वाचनप्रकारांमध्ये विभागलाही गेलेला असतो. त्यामुळे त्याला तुमच्याकडे खेचून आणणे, आणि मजकुराचा दर्जा राखून ते मासिक फायद्यामध्ये चालवणे ही तारेवरची कसरत असते. आजच्या तुलनेत पूर्वीच्या काळी साधनांची व तंत्रज्ञानाची खूप कमतरता असताना, तेव्हाच्या संपादकांनी ही कसरत कशी केली असेल याचा विचार करूनही अंगावर काटा येतो. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करून, नवनवीन लेखकांना प्रोत्साहन देऊन, त्यांना लिहिते करण्याची अचाट कामगिरी या विविध संपादकांनी पार पाडली होती. पुढे नामवंत झालेल्या अनेक लेखकांच्या लिखाणाची सुरुवात, अशाच मासिकांतून झाली होती, हे लक्षात घेतले तर त्या संपादकांचे महत्व आज लक्षात येईल. आता दोन वर्षापूर्वी बंद झालेले श्री. भानू काळे यांचे 'अंतर्नाद' सारखे दर्जेदार मासिक असो, काल मुकुल रणभोरला बंद करावा लागलेला 'अक्षर मैफल'चा अंक असो, किंवा जेमतेम एक वर्ष चालवून  बंद करावे लागलेले 'अक्षरधारा' हे श्री रमेश राठीवडेकर यांचे उत्तम मासिक असो,  ही सगळी आजच्या काळाची आव्हाने दर्शवणारी स्पष्ट उदाहरणे आहेत. पण अशा स्थितीतूनही मराठी साहित्याने आपली वाट काढली आहे. त्यामुळे यातूनही मार्ग निघेल. आणि तो काढावाच लागेल. डिजिटल माध्यम हा या समस्येवरचा तोडगा आम्हाला दिसतोय. आता मुकुलचंच उदाहरण घेता येईल. पुनश्चप्रमाणे त्याने केवळ डिजिटल स्वरूपात त्याचे मासिक चालवले, तर ते दीर्घकाळ टिकाव धरू शकते. पेपरच्या वाढत जाणाऱ्या किंमती, प्रत्यक्ष प्रिंटींग करणे आणि सभासदापर्यंत अंक पोहोचणे, हे तीनही खर्च या माध्यमात संपूर्णपणे वजा होतात. शिवाय आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे डिजिटल माध्यमांचा विस्तार ( reach) हा प्रिंट माध्यमापेक्षा कित्येक पट अधिक आहे. तिथे सोशल मिडीयाचा वापर करून योग्यप्रकारे विपणन ( मार्केटिंग) केल्यास मासिकासाठी उत्तम आर्थिक मॉडेल उभे राहू शकते. त्यामुळे अक्षर मैफलसाठी हा पूर्णविराम न ठरता, विचारमंथनाचा अर्धविराम घेऊन, नव्या जोमाने डिजिटल माध्यमात त्याने झेप घ्यावी ही आमची आंतरिक इच्छा आहे. अर्थात इथे मुकुल रणभोर अथवा अक्षर मैफल हे केवळ प्रातिनिधिक आहेत. आज प्रिंट माध्यमांत असलेल्या सर्वच मराठी नियकालिकांसमोर हे आर्थिक आव्हान असणार किंवा नजीकच्या भविष्यात निर्माण होणार आहे. ज्याचा विचार त्यांनी आजच करायला हवा असं आम्हाला वाटतं. नवीन स्वरूपाच्या डिजिटल माध्यमाची भीती न बाळगता, त्याचा अंगीकार करण्याची मानसिकता जर प्रिंट माध्यमातील मालक-संपादक यांनी रुजवली, तर येणाऱ्या काळात देखील त्यांच्या उत्तम साहित्याला उठाव राहील याबद्दल आम्ही निःशंक आहोत. आणि केवळ मराठी साहित्यालाच का? त्यावर आपली उपजिविका असलेल्या लेखक व संपादक यांनादेखील चांगले दिवस यावेत हा या सर्व उठाठेवीमागील हेतू आहे. गेली दोन वर्षे या माध्यमात काढल्यावर याचा थोडाबहुत अनुभव आमच्या गाठीशी जमा झाला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात कुठल्याही स्वरूपाचे काम करणाऱ्या व्यक्तींना त्या अनुभवाचा उपयोग झाल्यास आम्हाला आनंद होईल. ज्या ठेचा आम्ही खाल्या त्या तरी इतरांसाठी टळाव्यात यासाठी लागणारी मदत किंवा माहिती आमच्याकडून हवी असेल तर ती देण्यात  आम्हाला अतिशय समाधान  आणि आनंद  लाभेल. *** मंडळी, या महिन्याच्या १ तारखेला, म्हणजे संक्रांतीच्या अगोदरच, आम्ही आमच्या घरांतून चालणारा हा उपक्रम 'बहुविध' च्या पहिल्यावहिल्या ऑफिसमध्ये संक्रमित केला आहे. त्यामुळे आपणा सर्वांचे नव्या ऑफिसमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. ऑफिसचा पत्ता - बहुविध डिजिटल मिडीया बी-१, तळमजला, विजयवाडी निवास, हनुमान चौक, लोकमान्य टिळक रस्ता, मुलुंड (पूर्व ), मुंबई ४०००८१

संपादकीय

प्रतिक्रिया

 1. shubhadabodas

    2 वर्षांपूर्वी

  मराठी मासिक एकट्यानेच चालवणे कायम अवघडच होते.मराठी वाचक वर्गणीदार होत नाहीत. ते वाचनालयात जातात.

 2. Siddheshwar

    3 वर्षांपूर्वी

  अक्षर मैफल चा मी सभासद होतो, मला पाहिले तीन अंक मिळाले नंतर आपल्या पोस्टल विभागाची करामत झाली आणि एकही अंक मिळाला नाही त्यांच्या पहिल्या दिवाळी अंकात राजन खान यांनी लिहिलेला अभावाचे जिणे हा लेख मला फार आवडला होता,आजही माझ्या लक्षात आहे ,मलाही तसं च स्वप्नवत जीवन जगावेसे वाटते अक्षर मैफल डिजिटल स्वरूपात यायला हवे

 3. purnanand

    3 वर्षांपूर्वी

  अक्षर मैफल बंद झाल्याचे ऐकून वाईट वाटले.अर्थात ते वाचायचा कधी योग आला नाही.पण बंद होण्यामागे सवंग नव्हते हे सुद्धा एक कारण असावे .पंचवीस वर्षापूर्वी साप्ताहिक सोबत बंद झाले किवा दोन वर्षापूर्वी अंतर्नाद बंद झाले तेव्हा अशाच वेदना झाल्या.शहरीकरण, मोबाईल,टीव्ही यामुळे चांगल्या वाचनासाठी आवश्यक असलेला फुरसतीचा वेळ कुरतडला गेलाय असेही कुठेतरी वाटतेय. बऱ्याच वेळा असाही अनुभव घेतलाय की संग्रहीअसलेल्या एखाद्या दुर्मिळ पुस्तकातील दीड दोन पानाच्या लेखाचे झेरॉक्स दिले तरी महिनोन महिने ' नाही वाचायला जमले हो ' असे बिनधास्त सांगितले जाते. ते सुद्धा आधीच्या संभाषणात संबंधित विषयावर बोलणे झालेले असते.,आग्रहाने लेखाबद्दल मागणी केलेली असते तरीही.?हे कुठेतरी खटकते . असो. मुलुंडच्या जागेत सभासदांची संख्या खूप खूप वाढो यासाठी शुभेच्छा !

 4.   3 वर्षांपूर्वी

  अभिनंदनवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen