मित्र-मेळावा आणि मेळवावा...

संपादकीय    किरण भिडे    2019-05-28 10:30:25   

आपल्या सभासदांना आठवत असेल, गेल्या वर्षी ठाणे, पुणे आणि नासिक अशा तीन ठिकाणी पुनश्च वाचक-मेळावा संपन्न झाला होता. आणि या तीनही कार्यक्रमात पुनश्च-मित्रांनी आमचा उत्साह कमालीचा वाढवला. पण यंदा मे महिना उलटून चालला तरी अद्याप एकही वाचक-भेट झाली नव्हती. म्हणून मग गेल्या आठवड्यात १९ मे रोजी मुंबईत मुलुंडला हा कार्यक्रम ठरवला. रविवारी दुपारी ४ वाजता हक्काची झोप सोडून रखरखत्या उन्हात किती वाचक येतील? ही शंका नेहमीप्रमाणे मित्रांनी फोल ठरवली. विरार, अंधेरी, डोंबिवली, दादर , ठाणे, खारघर अशा विविध ठिकाणांहून रेल्वेच्या मेगा ब्लॉकची पर्वा न करता २० सभासदांनी हजेरी लावली. आपापल्या कार्यक्षेत्रात नावाजलेल्या, व्यस्त असणाऱ्या आणि तरीही साहित्याविषयी कृतीशील आस्था बाळगणाऱ्या मृदुला जोशी, उन्मेष मुळे, तुषार रेडीज, डॉ. सुबोध खरे, संजय मुळे, शैलेश पुरोहित, चिंतामणी अटाळे, पूर्णानंद राजाध्यक्ष, मंदार दामले, श्रीकांत शेवडे, मुकुंद करकरे, श्री. कडू, नम्रता कडू, सुनंदा भोसेकर, श्रीपाद गर्गे, राणी दुर्वे, संध्या मांगले, मनीषा लोहोकरे, या सर्व मित्रांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची सार्थता अधोरेखित केली. 'निवडक दिवाळी' या बहुविध.कॉम वरील कॅटेगरीचे ओनर मकरंद जोशी हे स्वतः बैठकीस आले होते. आणि अर्थातच मटा मुंबईचे संपादक श्रीकांत बोजेवार हे नेहमीप्रमाणे मार्गदर्शकाच्या भूमिकेत उपस्थित होते. झालेल्या मनमोकळ्या गप्पा, मित्रांकडून मिळालेल्या सूचना, उपाययोजना, भावी कल्पना यांचा वापर पुनश्च आणि बहुविध.कॉम च्या पुढच्या वाटचालीत निश्चित होणार आहे. याउलट कार्यक्रम संपल्यावर आम्हाला थोडी खंत वाटली, की सदर भेटीत या सभासदांना आम्ही म्हणावा तसा न्याय देऊ शकलो नाही. लेखिका राणी दुर्वे यांची सूचना आम्ही गांभीर्याने घेतली असून, पुढच्या मेळाव्यात सभासदांना काही ठोस वैयक्तिक कार्यक्रम देता यावा, अशा प्रकारे त्याचं नियोजन करू, असं आम्ही ठरवलं आहे. आपल्या अनेक वाचकांची या उपक्रमात स्वेच्छेने काम करण्याची मनिषा असते. बहुविध.कॉम ला प्रामुख्याने तीन कामांसाठी ते मदत करू शकतात. पहिले काम अर्थातच पोर्टलवर प्रसिद्ध करण्यासाठी दर्जेदार साहित्य गोळा करणे. दुसरे आपले पोर्टल विविध मार्गांनी अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवणे, म्हणजे थोडक्यात मार्केटिंग. आणि तिसरे प्रशासकीय काम, म्हणजे admin work. इच्छुक मित्रांची उपलब्धता, कामाच्या वेळा आणि स्किल्स यांचा विचार करून याबद्दल आपण वैयक्तिक भेटीत ठरवू शकतो. त्यासाठी आपण कधीही संपर्क करा. अर्थात तोवर या वीस जणांचाही एक नोटीफिकेशन ग्रूप तयार करून त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करूच. ** आपल्या देशात दोन महिने सुरु असलेला लोकशाहीचा सर्वात मोठा पंचवार्षिक उत्सव गेल्या आठवड्यात संपन्न झाला. आपलं पोर्टल जरी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नसले, तरी राजकारणापासून फटकून राहणे हा बहुविध.कॉम चा स्वभाव नाही. राजकारण्यांना सरसकट तुच्छ मानून साहित्यक्षेत्राचा विकास होईल अशा भ्रामक कल्पनेत आम्ही वावरत नाही. किंबहुना अधिकाधिक लोकांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, त्याचप्रमाणे समाजातील अधिकाधिक सत्प्रवृत्त व्यक्तींनी राजकारणात आपले स्थान निर्माण करावे, आणि त्यायोगे आपली भाषा व साहित्य यांचे संवर्धन व्हावे, अशी बहुविध.कॉम च्या संपादक मंडळाची निश्चित भूमिका आहे. आणि या धोरणाला अनुसरूनच आमची कृती असते. म्हणूनच केंद्रात आलेल्या नवीन सरकारचे आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून आपल्या या डिजिटल साहित्यविश्वाची प्राथमिकतेने जोपासना होईल अशी आशा व्यक्त करतो. जाता जाता- आपला मोठ्या प्रमाणात वाचकवर्ग जेथे आहे त्या डोंबिवली शहरात पुढील वाचक मेळावा घ्यावा असा मानस आहे. याखेरीज आपल्या सभासदांपैकी कुणाला त्यांच्या विभागात असा मेळावा घेणे गरजेचे आणि शक्य वाटत असेल तर त्यांनी जरूर प्रतिक्रिया द्यावी. तसेच यासंदर्भात थेट आमच्याशी संपर्क केल्यास आपले स्वागतच असेल. **

संपादकीय

प्रतिक्रिया

 1. shakambhari

    3 वर्षांपूर्वी

  औरंगाबादला असा कार्यक्रम ठेवावा.

 2. Namrata

    4 वर्षांपूर्वी

  लेख उत्तम आणि मित्र मेळाव्याचा अनुभव देखील वाचक म्हणून संपन्न करणारा !

 3. aniloak18@gmail.com

    4 वर्षांपूर्वी

  rambhide यांची सूचना उपयुक्त वाटते . अमलात आणण्याच्या दृष्टीने सोपीही आहे . संयोजकांनी जरूर विचार करावा

 4. rsrajurkar

    4 वर्षांपूर्वी

  विदर्भातील वाचक वर्गाची संख्या किती आहे .

 5. arya

    4 वर्षांपूर्वी

  जळगाव/खान्देश विभागातील वाचकांची संख्या कळेल काय? इकडे एखादे नियोजन मेळाव्याबाबत व्हावे यासाठी विचारणा......

 6. rambhide

    4 वर्षांपूर्वी

  वाचक संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपले उपक्रम व सभासद वर्गणी या संबंधातील एखादा WhatsApp संदेश पाठवू शकाल काय? हा संदेश आमच्या मित्रवर्गात forward करू व जास्तीत जास्त वाचकांना उद्युक्त करू शकू.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen